सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (10:12 IST)

राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणताही राडा नाही - जयंत पाटील

एका दैनिकाच्या न्यूज पोर्टलवर ''शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत राडा'' अशा अर्थाच्या मथळ्याखाली अतिरंजित वृत्त प्रकाशित केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी असे नमूद केले की,''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय बैठकांच्या माध्यमातून आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या तसेच ज्येष्ठ नेत्यांच्या सन्माननीय उपस्थितीत ही प्रक्रिया लोकशाही पद्धतीने सुरू आहे.या प्रक्रियेत मोकळेपणाने विविध मतमतांतरांना व विसंवादांना अंतर्भूत करून चर्चेच्या फेर्‍या घेतल्या जात आहेत.
 
दरम्यान एका प्रथितयश नियतकालिकाच्या न्यूज पोर्टलवर खोडसाळपणे या आढावा बैठकांमध्ये हाणामारी वा राडा झाला अशा आशयाचे अतिरंजित वृत्त दिले गेले.राजकीय चर्चा प्रक्रियेत तीव्र भावना व्यक्त होत असतात. अशा प्रकारे तीव्र भावना वृत्तवाहिन्यांच्या जाहीर चर्चासत्रांतही होत असल्याचे आपण पाहतो. मात्र त्याला आपण राडा किंवा हाणामारी असे संबोधत नाही. न्यूज पोर्टल्सनी वृत्त प्रकाशित करताना अतिरंजितपणा टाळला असता तर ते संयुक्तिक झाले असते. वृत्तात नमूद केल्याप्रमाणे हाणामारी किंवा राडा या पातळीवरचे कोणतेही घटित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती संस्कृती नाही." असे प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.