बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (21:58 IST)

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून 7500 रोपांच्या लागवडीचा संकल्प

plantation
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कॅम्पस व राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत सुमारे 75000 रोपांची लागवड करण्याचा संकल्प आरोग्य विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. या अनुषंगाने रविवार, दि. 01 मे 2022 रोजी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांच्या हस्ते वृक्षरोपण मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे तद्नंतर विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते एकाच वेळी 750 रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
 
विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्याचा आणि पर्यावरणाचा थेट संबंध असून उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या सर्व विद्याशाखांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने पर्यावरण व वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थी व शिक्षक यांच्या मदतीने महाविद्यालय परिसरात सुमारे 75000 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ विद्यापीठातील ग्रीन कॅम्पसअंतर्गत सुमारे 750 वृक्षलागवडीने करण्यात येणार आहे. विद्यापीठ परिसरात वृक्षलागवड करतांना विशिष्ट पध्दतीने वर्गीकरण करण्यात आले असून यामध्ये रुची उद्यान, गंध उद्यान, श्रवण उद्यान, दृष्टी उद्यान व स्पर्श उद्यान असे भाग तयार करण्यात आले आहेत. वृक्षांच्या सानिध्यात मानवी शरिरातील पाचही ज्ञानेंद्रिय उल्हासित होतील अशी त्यामागे कल्पना आहे.
 
त्या पुढे म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी यासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वृक्षारोपण उपक्रमात घेण्यात आला आहे. वाढते प्रदुषण, तापमान वाढ, पाणी टंचाई आदी समस्यांचे निवारण करण्यासाठी सर्वानी वृक्षरोपणाचे उपक्रम आपल्या परिसरात राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठ कॅम्पसमध्ये लागवड करण्यात आलेल्या रोपांना जिओटॅग करण्यात येणार असून त्या वृक्षाचे औषधी उपयोग, छायाचित्र व माहिती स्मार्ट मोबाईलने क्युआरकोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध होईल. शासनाने निर्देर्शित केल्यानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातंर्गत विद्यापीठाचा परिसर हरित आणि सुंदर करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण करावे व पर्यावरण रक्षणासाठी काळजी घ्यावी असा संदेश विद्यापीठाकडून सर्वांना देण्यात येत आहे.
 
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठात आयोजित वृक्षरोपणासाठी नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, गोखले नर्सिंग कॉलेज, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, एन.डी.एम.व्ही.पी. कॉलेज ऑफ नर्सिंग, एन.डी.एम.व्ही.पी. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, भोसला नर्सिंग कॉलेज, आयुर्वेद सेवा संघ संचलित आयुर्वेद महाविद्यालय, धन्वंतरी होमिओपॅथी कॉलेज, सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय, साई केअर कॉलेज ऑफ नर्सिंग, के.बी.एच. दंत महाविद्यालय आदी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठातील रुची उद्यानात फालसा, धामणी, अटरुन, भोकर, शिवण, जंगली अजान, ऍपल बोर, चोरोळी, सिताफळ, पेरु, अंजीर , आंबा, नारळ, चिकु , गोरख चिंच, फणस, सुपारी, मरुड शेंग, रामफळ, निंबु, संत्रा , ड्रॅगन फ्रूट, चेरी, मोसंबी, जांभुळ, चिंच, डाळींब आदी वृक्षांचा समावेश आहे तर श्रवण उद्यानात गोल्डन बांम्बु, मारवेल बांम्बु, पम्पस गा्रस, सादडा वृक्षांचा समावेश आहे. तसेच गंध उद्यानात कुडा, चित्रक, मेहंदी, निरगुडी, हेन्कल, अडुळसा, प्लंबेगो, अबोली, कोरंटी, कुफीया, मुसांडा, कबवासी, जाटारोफा, अलीसंम, एक्सझोरा, धायटी, पारिजातक, अंकोल, मुचकुंद, टीकोमा, रातराणी, मधुकामिनी, मोगरा, प्लुमेरिया आल्बा, हिबिक्सस, गावराण गुलाब, अनंता, जाई, जुई, रानजुई, कुंदा, सोनचाफा, प्लुमेरिया रुबरा, सितारंजन, लेमणग्रास, मारवा या वृक्षांचा समावेश आहे. दृष्टी उद्यानात रोईओ, टाकला, तरवड, कन्हेर, फाईक्स, जास्वंद, हमेलिया पॅटर्नस्, क्रॉटन, टगर, शंकासुर, मालफिगीया या वृक्षांचा समावेश आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांची काळजी घेण्यासाठी विविध गट तयार करण्यात आले आहेत तसेच झाडांना नियमित पाणी, सावली मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.