सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (09:49 IST)

'त्या' युरेनियम प्रकरणचा तपास आता एनआयएकडे

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथ (एटीएस) ने जप्त केलेल्या ७ किलो युरेनियम प्रकरणचा तपास आता नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) ने हाती घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणातील यापुढील तपास आता एनआयए करणार हे स्पष्ट झाले आहे. या संपुर्ण प्रकरणात युरेनियमचा संबंध आल्यानेच आता यापुढील तपास एनआयए करणार आहे. एटीएसने काही दिवसांपूर्वीच गोवंडी भागातून स्क्रॅपमधून मोठ्या प्रमाणात युरेनियम जप्त केले होते. एटीएसने जप्त केलेल्या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख इतकी आहे. एटीएसने जिगर पांड्या आणि अबू ताहीर यांना आधीच अटक केली आहे. शासनाने प्रतिबंधित पदार्थ म्हणून निर्देशित केलेले नैसर्गिक युरेनियम बाळगल्या प्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या दोघांनाही १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
जिगर पांड्या आणि अबु ताहीर अफझल चौधरी हे दोघेही गेल्या वर्षभरापासून युरेनियमसाठी ग्राहक शोधत होते. याचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होतो हेदेखील दोघांनी गुगलवर शोधून काढले होते. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या ७ किलो युरेनियम विकण्यासाठी ग्राहकाचा शोध यांनी सुरू केला. पण दरम्यानच्या कालावधीत या संशयास्पद गोष्टीची माहिती ही एटीएसच्या अधिकाऱ्यांना लागली. त्यानुसार एटीएसचे पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या नेतृत्वातील टीमने या प्रकरणाचा सापळा लावला. ग्राहक म्हणून खुद्द संतोष भालेकर हेच युरेनियम खरेदीसाठी गेले होते. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. त्यानंतर चौकशीमध्ये युरेनियम हे गोवंडीच्या मंडाला परिसरात ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.