1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: करकंब , शनिवार, 30 मे 2015 (11:53 IST)

आईनेच केला मुलीचा खून

मुलीचे अपहरण झाल्याची  खोटी तक्रार पोलीस ठाणत देणार्‍या आईलाच तीन दिवसांनी तिच्या मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील असून यात मोनाली गोरख राऊत या तेरा वर्षाच्या  मुलीला जीव गमवावा लागला आहे.
 
यातील आरोपी या मुलीची आई स्वाती गोरख राऊत (वय 30, रा. खारे वस्ती) करकंब व या मुलीचे आजोबा मोहन कुंडलिक घाडगे (रा. तुळशी ता.माढा) या दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची हकिकत अशी की, 25 रोजी स्वाती राऊत या महिलेने आपली मुलगी मोनाली हिस कोणी अज्ञात इसमाने दुपारी साडेचारच सुमारास पळवून नेले असल्याची फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
 
या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला. 28 मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान करकंब येथील शेटेवस्ती जवळील बागवान यांच्या उसाच्या शेतात मोनाली राऊत हिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर मोनालीचा खून हा गळा आवळून झालचे निष्पन्न झाले.
 
दरम्यान, करकंब पोलिसांनी आणखी तपास केला असता मत मुलीची आई स्वाती राऊत व मुलीचे आजोबा मोहन घाडगे यांनीच त्यांच्यातील अनैतिक संबंधात अडथळा होऊ नये म्हणून मुलीचा गळा आवळून खून केल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 25 तारखेला अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू तसेच अपर अधीक्षक मनीषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कौसडीकर तसेच सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तसेच करकंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए.एस. माने यांनी या घटनेचा तपास केला. 
 
दरम्यान, आईनेच पोटच्या मुलीचा खून केल्याच्या या घटनेची चर्चा करकंबसह पंढरपूर तालुक्यात आज दिवसभर होती.