गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

मनभावन हा श्रावण!

श्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे खास स्त्रियांचे सण याच महिन्यात येतात. त्यानंतर येणारे गौरी-गणपतीही खुणावत असतात. नागपंचमीपासून नवरात्र, दिवाळी या सगळ्या हव्याहव्याशा वाटणार्‍या सणांची सुरुवात होते. आपल्या कृषिप्रधान देशात आजही शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या, पिकाची नासधूस करणार्‍या उंदीर-घुशींचा नायनाट करणार्‍या सर्पदेवतेची पूजा केली जाते. पंचमीनंतर येणारी राखीपौर्णिमा म्हणजे स्त्रियांच्या माहेरचा जिव्हाळा सासरघरी येण्याचा दिवस. यादिवशी सकाळपासून घरादारात चकरा सुरु होतात. भावाची आतुरतेने वाट पाहिली जाते. भावाला साखरभात खायला घालायचा असतोच पण आईकडून डब्यात येणार्‍या ओल्या नारळाच्या करंज्यांचीही वाट पाहिली जाते! नाजूक रेशमाच्या धाग्याने सगळे बंध बांधून ठेवलेले असतात. या सणाबरोबरच सोमवार, शुक्रवार, मंगळागौर, सत्यनारायण हे खास श्रावणाचे मानकरी असतातच. श्रावणातील प्रत्येक दिवसच सण होऊन जातो. अशा आनंदी वातावरणामुळेच असेल कदाचित पण, श्रावणात मनाच्या सांदी कोपर्‍यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात. बहुतेक सगळ्या सणांमध्ये आणि अंगीकारल्या जाणार्‍या व्रतवैकल्यामध्ये येणार्‍या संकटांमधून निर्भीड आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी शक्ती मिळवण्याची प्रेरणा मिळते. संसारातील सुख-दुःखांचा सारीपाट मांडला असताना मन मोकळं करून सख्यांना समजून घेण्याचे हक्काचे क्षण हा महिना देऊन जातो.
पुराणातील सावित्री, सीता, द्रौपदी, अहिल्या आणि तारामती या सगळ्यांचा वारसा जपण्याची ही परंपरा... 'उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको' असं म्हणत स्वतःला खंबीर बनवण्याचा हा एक निखळ मार्ग. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या परंपरा पाळत आलो आहोत. नवचैतन्य निर्माण करणार्‍याया सणांना आजही तितकंच महत्त्व दिलं जातं. पुराणांशी आणि परंपरेशी घट्ट नातं बांधून घेणार्‍या स्त्रियांना बळ प्राप्त करून देणारं हे विश्व. काळानुरूप सणवार साजरे करण्याच्या पद्धती बदलत असल्या तरी त्यांचं महत्त्व तसुभरही कमी झालेलं नाही. पावसाच्या सरींबरोबर मनाच्या कोंदणातील भाव व्यक्त करण्याचा आजी आणि माय-मावशांनी दिलेला वारसा आपण आजही जतन करून ठेवला आहे. या महिन्याला पावसाची खूप सुंदर साथ असते. या हलक्या सरींबरोबर मन उल्हासित झालं नाही तरच नवल. स्त्रियांच्या भावविश्वात पावसाचं स्थान अनन्यसाधारण आहे. पावसाच्या सरींबरोबर गाण्यांच्या सप्तसुरांमधून मन मोकळं करण्याची हातोटी असल्यामुळे पाऊस, सणवार आणि गाणी हे समीकरण श्रावणात पक्क झालं आहे. नागपंचमी, मंगळागौरीला रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा यासारखे खेळ खेळताना पारंपरिक गाण्यांची आठवण होणं तितकंच स्वाभाविक. पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर पडण्याची संधी मिळत नसे. आजच्या स्त्रिया नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडू लागल्या आहेत. पण घरातील व्याप सांभाळून ऑफिसिमधील कामांचा ढीग संपवताना स्वतःसाठी वेळ काढणं आजच्या स्त्रीलाही शक्य होत नाही. म्हणजे एकूणच कायतर मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी संधी, निमित्त हवं असतं. ही संधी मिळवून देणार्‍या या हक्काच्या सणांचं रूप आज काहीसं बदलत आहे. पूर्वी मंगळागौरीची गाणी स्वतः स्त्रिया म्हणायच्या, आता कॅसेट किंवा सीडीची मदत घेतली जाते. काही ठिकाणी कार्यक्रम करणार्‍या, पारंपरिक खेळ दाखवणार्‍या महिलांच्या गटांना पाचारण केलं जातं. अलीकडे चित्रपटांमधील गाण्यांवर नाचण्याची प्रथाही रूढ झाली आहे. 
आजची आधुनिक स्त्री पाश्चात्त्यांच्या प्रभावाखाली आली असून भारतीय परंपरांकडे पाठ फिरवते असं म्हटलं जातं. वास्तवात परिस्थिती उलट आहे. भारतीय परंपरा नाकारणार्‍या किंवा त्याकडे पाठ फिरवणार्‍या महिलांचा गट फारच छोटा आहे. आपण सामान्य स्त्रियांचा विचार करतो तेव्हा या परंपरा आणि सणावारांना महत्त्व देणार्‍यांची संख्या जास्त असल्याचं जाणवतं. मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रिया तर या परंपरा जिवंत ठेवणार्‍या मुख्य आधारस्तंभ आहेत. 
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत श्रावणमासातील सर्व व्रतवैकल्यं पाळणं काहीसं अशक्य होऊ लागलं असलं तरी विशिष्ट सणवार अगदी उत्साहाने साजरे केले जातात. परंपरा म्हणून किंवा चेंज आणि फॅशन म्हणूनही हे सणवार साजरे केले जातात. एकूणच स्त्री कितीही आधुनिक झालीतरी भावविश्वावर कोरलेले नाजूक भावबंध आजही तिला महत्त्वाचे वाटतात हे महत्त्वाचं. मानवी नातेसंबंधातील दुरावे सांधण्याचं काम हे सण-समारंभ नेहमीच करत आले आहेत. सणांमुळे दुरावे कमी होण्यास मदत होते. एरवी तंटणार्‍या नणंदा-भावजया या सणांच्या निमित्ताने एकत्र येतात. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर जात आहोत. सणांच्या निमित्ताने निसर्गाशी तुटलेला संवाद साधला जातो. मंगळागौर आणि हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारी फुलं आणि पत्री बाजारातून आणत असलो तरी त्यांच्या सुगंधाने दरवळलेलं मन पुन्हा पुन्हा बागेकडे धाव घेतं. आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांना रोज या ना त्या कारणामुळे धावपळ करावी लागते. काळाबरोबर बदलत गेल्यामुळे आपल्या परंपरांचा विसर पडतो असं नाही. आजच्या आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांनी आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला असला तरी परंपरांकडे पाठ फिरवलेली नाही. परंपरांचं जतन करताना आवश्यक तिथे काही बदल केले जातात. पण मूळ भावना, संवेदना संपत नाहीत. मन, निसर्ग आणि संस्कृती यांच्या समीकरणातून निर्माण झालेल्या या परंपरा दीर्घकाळ टिकून राहतील इतक्या परिपक्व आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे निश्चिंत होऊन आपण सर्वांनीच त्यांची कास धरायला हवी. श्रावणमासातील हर्ष मनात उतरवून घ्यायला हवा.
 
मंजिरी ढेरे