रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बीजिंग , मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (11:12 IST)

हिंगीस-जान जोडीने चायना ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले

स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस आणि तैवानची चॅन जंग जान या अग्रमानांकित जोडीने चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विजेतेपद पटकावताना मोसमाअखेरच्या मास्टर्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा पराक्रम केला. हिंगीस व चॅन जंग जान या जोडीने अंतिम फेरीत तिमिया बाबोस व अँड्रिया लाव्हाकोव्हा या चतुर्थ मानांकित जोडीचे आव्हान 6-1, 6-4 असे सहजगत्या मोडून काढत विजेतेपदाची निश्‍चिती केली.
 
त्याआधी हिंगीस-जान जोडीने भारताची टेनिसतारका सानिया मिर्झा आणि तिची साथीदार चीनची शुआई पेंग या जोडीचे आव्हान उपान्त्य फेरीच्या अत्यंत संघर्षपूर्ण लढतीत 2-6, 6-1, 10-5 असे संपुष्टात आणताना अंतिम फेरीत धडक मारली होती. तर तिमिया व लाव्हाकोव्हा जोडीने दुसऱ्या उपान्त्य लढतीत एकेटेरिना माकारोव्हा व एलिना व्हेस्निना जोडीचा 7-5, 4-6, 10-8 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. हिंगीस-जान जोडीने गेल्या आठवड्यातील स्पर्धेतही सानिया व शुआई यांना हिंगीस व चॅन जंग जान यांच्यावर उपान्त्य फेरीतच मात केली होती व त्यानंतर अंतिम फेरी जिंकून विजेतेपद पटकावले होते.
 
महिला एकेरीत बिगरमानांकित कॅरोलिन गार्सियाने द्वितीय मानांकित सिमोना हालेपवर 6-4, 7-6 अशी खळबळजनक मात करताना विजेतेपदाचा मान मिळविला. सिमोना हालेपने त्याआधी येलेना ऑस्टापेन्कोवर 6-2, 6-4 अशी मात करताना अंतिम फेरी गाठताना विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानावर झेपही घेतली होती. परंतु अंतिम फेरीत तिला गार्सियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. पुुरुष एकेरीत अग्रमानांकित राफेल नदालने आठव्या मानांकित निक किरगियॉसचा 6-2, 6-1 असा फडशा पाडताना विजेतेपद पटकावले.