सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (08:47 IST)

देवेंद्र झाझरिया, सरदार यांना खेलरत्न

रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॅरा ऍथलीट देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांना राजीव गांधी खेलरत्न हा देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी साजऱ्या करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडादिनी, म्हणजेच येत्या 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पुरुष क्रिकेटपटू चेतेश्‍वर पुजारा व महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच भूपेंद्र सिंह (ऍथलेटिक्‍स), 2) सय्यद शाहीद हकीम (फुटबॉल) व 3) सुमाराई टेटे (हॉकी) यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 
क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राजीव गांधी पुरस्कार हा गेल्या चार वर्षांच्या काळात ऑलिम्पिक किंवा जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येतो. तर अर्जुन पुरस्कार सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येतो. पदकविजेत्या खेळाडूला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य आणि खेळाच्या विकासासाठी वाहून घेणाऱ्यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो.
 
यावर्षी पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात नामांकन मिळाले होते. माजी ऑलिम्पिक खेळाडू, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त व्यक्ती, क्रीडा पत्रकार, जाणकार, समालोचक आणि क्रीडा विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड केली. न्या. सी. के. ठक्‍कर खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष होते. तर राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक व माजी ऑल इंग्लंड विजेते पुल्लेला गोपीचंद द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांच्या निवड समितीचे अध्यक्ष होते.