मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By वेबदुनिया|

प्रेमाची अबोली !

आपल्या जीवनाच्या बागेत अलगद उमललेले फूल म्हणजे 'प्रेम'. प्रेमाची अडीच अक्षरे आपण गिरवू लागलो की, आपल्याला सगळं सगळं कळायला लागतं. आपल्या विचारात, वागण्यात, चालण्यात एवढेच नव्हेतर आपले डोळे ही विशिष्ट प्रकारची बोली बोलायला लागतात. आपल्या देहात जणू प्रेम... प्रेम... असे नाद गुंजू लागतात आणि मग होता रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र. परंतु, असे प्रेम अभिव्यक्त करायला शब्द सुचत नाहीत. मग देहबोलीतूनच 'ती' किंवा 'तो' मनात फुलणारे प्रेम व्यक्त करतात.....

'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं' असं कितीही म्हटलं तरी मनातलं 'गुपित' ओठावर आणण्याची किंवा ते व्यक्त करण्‍याची प्रत्येकाची विशिष्ट प्रकारची शैली असते. कोणी 'प्रेम' शब्दात व्यक्त करतं. तर कोणी नजरेचे तीर पाठवतं. 'प्रेम' व्यक्त करायला कधी कधी शब्द अपुरे पडतात आणि मनात पिंगा घालणारे प्रेम 'तिच्या' किंवा 'त्याच्या' देहबोलीतून प्रकट होते. संबंधित संदेशाचे 'ती' अर्थ लावते. यासाठी प्रेमाच्या गावाला जाण्यापूर्वी त्या प्रांतातल्या भाषेची जाण आवश्यक असते.

प्रेमाच्या गावाला जाणार्‍यालाच काय तर सोळाव्या वर्षात पदार्पण करणार्‍या प्रत्येकालाच थोडी थोडी ही भाषा शिकायला लागते. काही दिवस तर भावनाना शब्दरूप मिळतच नाही, डोळ्याच्या खाणाखुणांचे खेळ सुरू होतात. आपले डोळे फार चमत्कृती असतात. असंख्य प्रकारच्या भावना ते व्यक्त करू शकतात. आनंद- दु:ख, इच्छा-आकांक्षा, राग, भीती, पसंती-नापसंती दर्शवत असतात.