शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (15:02 IST)

ध्यान करून मेंदूला तल्लख बनवता येऊ शकतं का?

spiritual
आधुनिक जीवनाच्या धावपळीत, आपल्यासमोर अशी अनेक कामे येतात, जी पूर्णपणे नवीन असतात. असं असतानाही आपण ती कामं अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो.
 
आपला मेंदू याला कारणीभूत आहे. मेंदूमध्ये स्वत:ला नवीन परिस्थितीनुसार बदलण्याची आणि व्यवहार करण्याची क्षमता असते.
 
दैनंदिन घडामोडींमुळे मेंदूमध्येही बदल होऊ शकतात आणि त्याची कार्यपद्धती बदलू शकते. याचे अनेक पुरावे सापडले आहेत.
 
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा मेंदूवर इतका परिणाम होतो की त्याची कार्यपद्धतीच बदलून जाते का? हे शोधण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला.
 
मेलिसा हॉगेनबूम या विज्ञान विषयात पत्रकारिता करतात. आयुष्यातील काही गोष्टी बदलून मेंदू तल्लख करता येऊ शकतो, असा त्यांचा विश्वास आहे.
 
सर्वप्रथम त्यासाठी त्यांनी स्वत:चा मेंदू स्कॅन करून घेतला. त्याची 'फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एफआमआरआय) म्हणजेच 'कार्यात्मक चुंबकीय अनुनाद इमेजिंग' चाचणी करण्यात आली.
 
ती म्हणते, "स्कॅन करताना कशाचाही विचार न करणे अशक्य आहे. मला एका मशिनसमोर (एफएमआरआय) नेण्यात आले ज्यामधून खूप मोठा आवाज येत होता. मला एका काळ्या फुलीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. माझ्यासाठी डोळे उघडणे देखील कठीण होतं. मला चाचणीच्या निकालाचीही काळजी वाटत होती."
 
वागण्यातील बदलामुळे मेंदूही बदलतो का?
मेलिसाला ही चाचणी आणि पुढील सहा आठवड्यांच्या प्रयोगानंतरच्या चाचण्यांची एकमेकांशी तुलना करायची होती.
 
तिला यावरून तिच्या मेंदूत काय बदल झाले हे समजून घ्यायचे होते.
 
या चाचणीचे निकाल जाणून घेण्यासाठी तिने वैद्यकीय मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली.
 
ती म्हणते, "ध्यानासारखी सामान्य वाटणारी गोष्टसुद्धा मेंदूमध्ये बदल घडवून आणू शकते याचं मला खूप आश्चर्य वाटलं. पण प्रश्न असा आहे की ते माझ्या मेंदूसाठी परिणामकारक ठरेल का?"
 
तिने सांगितलं की, "मानसशास्त्रज्ञ थॉर्स्टन बर्नहॉफर यांनी ध्यानाशी संबंधित एक संशोधन अभ्यासक्रम पुढील सहा आठवड्यांसाठी मला करायला दिला. यामध्ये मी दररोज एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकत 30 मिनिटे ध्यान करत होते. याशिवाय इतरही काही उपक्रम केले जात होते."
 
ध्यानाचा संबंध मेंदूच्या बळकटीशी
ध्यानाची प्रथा हजारो वर्षे जुनी आहे. पण अलिकडच्या काही दशकांमध्येच मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांनी या विषयावर सखोल संशोधन सुरू केले आहे. विविध संशोधनाअंती ध्यानाची उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतर आता ध्यान करण्याची शिफारस केली जाऊ लागली आहे.
 
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेव्हिड क्रेसवेल यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी अनेक संशोधनांचा संदर्भ देऊन लिहिले होते की, मानसिक शांतता आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे.
 
जर्मनीतील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिकच्या संशोधक ब्रिटा होल्झल आणि अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या संशोधक सारा लाझर यांनी सांगितले की मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरते.
 
मानसशास्त्रज्ञ मेलिसा हॉगेनबूम म्हणतात, "ध्यान करताना तुम्हाला तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्यावे लागते. खरंतर या प्रक्रियेत मेंदू काम करत असते. हे करत असताना मेंदूचं विचलित होणं बंद होऊन जातं. ज्याचा निष्कर्ष हाच आहे की मेंदू काम करतोय. आपण श्वासोच्छवास करतो, म्हणजे आपण एकाच वेळी दोन गोष्टी करत आहोत."
 
लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण श्वासाच्या मदतीने स्नायूंना बळकट बनवत असतो. यावेळी आपण आपली शारीरिक, मानसिक क्षमता वाढवत असतो.
 
लक्ष देण्यासोबतच सावधगिरीदेखील महत्वाची
नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील मानसशास्त्रज्ञ मोनालिसा दत्ता सांगतात, "कोरोना साथीच्या काळात लोकांचे सामाजिक जीवन नगण्य होते. मृत्यूची भीती आणि नकारात्मकता लोकांमध्ये इतकी भिनली होती की त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. कोरोनानंतर चिंता आणि तणाव तसेच नैराश्य वाढत असल्याची प्रकरणं वाढत असल्याचं दिसून आलं."
 
त्या म्हणतात, "आपण चांगला आहार घेतला पाहिजे, झोपायला पाहिजे आणि वेळेवर उठले पाहिजे, काही वेळ सूर्यप्रकाशात राहून निसर्गासोबत वेळ घालवला पाहिजे. आज जवळपास प्रत्येकाचा स्क्रीन टाइम (मोबाइल अथवा लॅपटॉवरील वेळ) खूप जास्त आहे. यामुळे लोकांचा फक्त तणाव वाढत नाहीए तर त्यांचा स्वभावही आक्रमक होत चालला आहे. यामध्ये सुधार घडवून आणण्यासाठी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावहारिक आयुष्यातही संतुलन निर्माण करावे लागेल."
 
याशिवाय, मोनालिसा दत्ताने खाण्याच्या सवयी सुधारण्याचा आणि निरोगी जीवनशैली पाळण्याचा सल्ला देण्यासोबतच योगा आणि ध्यान करण्याचाही सल्ला दिला.
 
"आजच्या व्यस्त जीवनात तणाव टाळता येत नाही, पण तो कमी करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणासारख्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे."
 
असं असताना त्या हा इशारादेखील देतात की, ध्यान केवळ तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच केले पाहिजे. विशेषतः ज्यांना नैराश्याने ग्रासले आहे कारण त्यांना बंद खोलीत किंवा एकांतात अस्वस्थ वाटू शकते.  
 
सहा आठवड्यांनंतर मेलिसाला तिच्या प्रयोगात काय आढळले?
 
सहा आठवडे पूर्ण झाल्यावर या प्रयोगाचा तिच्या मेंदूवर काय परिणाम झाला हे जाणून घेण्याची मेलिसाला उत्सुकता होती.
 
पुन्हा एकदा तिने आपल्या मेंदूचे स्कॅनिंग केले आणि नंतर दोन्ही चाचण्यांचे अहवाल मानसशास्त्रज्ञ बर्नहोफर यांना दाखवले.
 
बर्नहोफर यांनी दोन्ही स्कॅन अहवाल पाहिले आणि मेलिसाला सांगितले की तिच्या मेंदूतील बदल स्पष्टपणे दिसत आहेत.
 
तिच्या मेंदूच्या उजव्या बाजूला असलेल्या 'अमिग्डाला'च्या (Amygdala) अर्ध्या भागाचा आकार कमी झालेला. 'अमिग्डाला' ही मेंदूतील बदामासारखी रचना आहे ज्याला भावना किंवा भावनांचे केंद्र म्हणतात. हा बदल अगदी किरकोळ पण स्पष्टपणे दिसत होता.
 
मेलिसाच्या प्रयोगाचे परिणाम शास्त्रज्ञांच्या प्रकाशित संशोधनाच्या दिशेने घेऊन जातात ज्यात असे म्हटले आहे की, ध्यान केल्याने 'अमिग्डाला'चा आकार कमी होतो. तणावामुळे त्याचा आकार वाढतो.
 
न्यूरोप्लास्टिक - मेंदूच्या सामर्थ्याचे रहस्य
मानवी मेंदूचा स्वभाव शिकण्याचा, बदलण्याचा आणि स्वतःला विकसित करण्याचा आहे. हे प्लास्टिकसारखे आहे जे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बदलू शकते. याला न्यूरोप्लास्टिक म्हणतात, ज्याचा सरळ अर्थ असा होतो की जसे आपले विचार बदलतात, मेंदूची रचना आणि त्याची कार्यपद्धती बदलते.
 
तसेच, योग, ध्यान आणि व्यायाम यासारख्या गोष्टींद्वारे आपण आपल्या मेंदूची ताकद, आकार आणि तल्लखपणा वाढवू शकतो.
 
पूर्वी असे मानले जात होते की हे सर्व केवळ वयात येईपर्यंतच घडू शकते, परंतु आता आपल्याला कळले आहे की ही एक निरंतन शक्ती आहे जी आपली ओळख घडवत राहते. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा तो त्वरीत स्वतःला त्यानुसार जुळवून घेतो.
 
स्वतःवर केलेल्या प्रयोगात मेलिसा हॉगेनबूम यांना आढळले की ध्यान केल्याने मेंदूचे आरोग्य काही प्रमाणात सुधारू शकते.