शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : मंगळवार, 17 एप्रिल 2018 (17:54 IST)

अक्षय्य मागणं - आनंदाचं

अक्षय्य तृतीया उद्यावर येऊन ठेपली आहे. त्या दिवशी दानधर्मादी कर्म केले असता अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारे पुण्य मिळते, अशी ही आखी तिज. साधारणपणे हिंदू वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सुमुहूर्त. कोणतीही पूजा अथवा शुभकार्य करावाचे असल्यस उत्तम मुहूर्त. खरेदी हा तसा प्रत्येकाचा आवडीचा आणि जिव्हाळचा विषय. खरेदी करण्यासाठीही हा सुमुहूर्त. जेवणाच्या सुटीत याबद्दल सगळी चर्चा झालेली असल्याने मुहूर्तावर आपण काय खरेदी करायची असा विचार मनात सुरू होताच पण नेमका आज ऑफिसमधून घरी जायला उशीर झाला होता. आधीच उशीर झालेला आणि त्यात भर म्हणजे प्रत्येक चौकात वेगवेगळ्या कारणास्तव झालेली वाहतुकीची कोंडी. त्या वाहतुकीच्या गोंधळात विनाकारण अडकल्याने माझी उलघाल अधिकच वाढत होती, घरी लवकर येण्यासाठी. एकाच सिग्रनला गाडी चारवेळा थांबली, इतकी कमालीची गर्दी झालेली वाहनांची.
 
सिग्नलवरच फेरीवाल्यांचे चांगलेच फावले होते. या प्रकारात भिकारी सदृश ते सगळे फेरीवाले कोणी पेन, फुले, फुगे, गजरे, नकाशे, रंगवह्या असे काहीबाही विकत होते. काही गाडीवाले लोक विकत घेत होते. काही नुसत्याच चौकशा करत होते. काही लोक हे सगळं पाहात होते. तर काही लोक या सगळ्यापासून अलिप्त होते. या अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांचा मी विचार करत होते आणि हिरवा सिग्नल मिळाला एकदाचा. मी घाईघाईने डाव्या दिशेने गाडी वळवली. हिरवा सिग्नल असल्याने गाडी बर्‍यापैकी वेगात होती आणि अचानक एक फेरीवाली मुलगी हातात गुलाबाच फुलांचे गुच्छ घेऊन बेभान पळत गाडीसोर आडवी आली. नुसती आडवी आली असं नाही तर चक्क, भरधाव गाडी ओलांडून, अशा अजून इतर दोन-चार गाड्यांना पार करून ती पलीकडच्या रस्त्यावर पळत निघून गेली. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवून गाडी पटकन्‌ थांबवू शकल्याने मी थोडी धास्तीयुक्त सुखावले.
 
घराच्या दिशेने गाडी चालवत असताना आणि खरेदीचे बेत मनातल्या मनात असताना एक विचार मनात आला की, ही मुलगी इतकी जिवावर उदार झाल्यासारखी रस्ता ओलांडून का गेली असावी? याचं उत्तर मिळविण्यासाठी मला फार विचार नाही करावा लागला. लगेच लक्षात आलं की, सिग्नल सुटल्याने पैसे घ्यायचे राहिले असतील आणि पैसे घेण्यासाठी ती बेभान पळत सुटली असावी. हीच एकमेव शक्यता. कारण याव्यतिरिक्त इतकं जिवावर उदार होऊन पळत जाण्याजोगं काहीच असू शकत नाही. त्या पैशावर तिचं खाणं अवलंबून असेल. तिची आई अथवा भावंडं भुकेली असतील. तर त्यांचंदेखील पोट त्यावर चालत असेल. ती तरी काय करणार बिचारी. म्हटलंच आहे, 'अन्नासाठी दाही दिशा...'
 
या विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडायला मनात अजून एक विचार आला की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी परमेश्वराजवळ मागणं मागायचं की, या अथवा जगातील अन्य सर्वच पीडितांना सुख लाभू दे. जिथं अज्ञान आहे तिथं नंदादीप उजळू दे. जिथं दुःखाची अगतिकता आहे तिथं समाधान मिळू दे. जिथं पोटातील भूक भागवायला त्या मुलीसारखं जिवावर उदार व्हावं लागतं तिथं भाजी-भाकरी पोटभर मिळू दे. जिथं जिथं जे जे उणं आहे ते ते सर्व अधिकाधिक मिळून आनंद द्विगुणीत होऊ दे. यंदाच्या अक्षय् तृतीयेला परमेश्वराला हेच साकडं घालणार की, जिथे जिथे काहीही नाही तिथे सर्व काही आहे असं घडू दे. अमंगळाचा नाश होऊन मंगलदायक सर्व काही घडू दे आणि प्रत्येक नात अक्षय्य म्हणजेच कधीही क्षय न होणारा, लोप न पावणारा आनंद बहरू दे...

मंजिरी सरदेशमुख