सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

विनातिकिट विमानप्रवास करणारे जेव्हा आकाशातून खाली पडतात...

गेल्या रविवारची घटना. दुपारची वेळ होती. लंडनमधल्या एका रहिवासी भागात एका बागेत एक जण अचानक आकाशातून खाली पडला.
 
त्याचा आधीच मृत्यू झाला होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या मृतदेहाला कसलीच इजा झालेली नव्हती. तो मृतदेह पडला तेव्हा बर्फासारखा टणक झाल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
 
पोलिसांनुसार ती व्यक्ती नैरोबीतून हिथ्रो एअरपोर्टला येणाऱ्या केनिया एअरवेजच्या विमानाच्या लँडिग गिअरमध्ये लपून बसली होती आणि विनातिकीट प्रवास करत होती. विमानातलं लँडिंग गिअर म्हणजे विमानाच्या खालची अशी जागा जी लँडिंग करताना उघडते, म्हणजे जिथे चाकं असतात ती जागा.
 
पण ती व्यक्ती तिथे काय करत होती?
 
अनेक जण जमीन आणि समुद्रामार्गे युरोपात जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून बसून प्रवास करण्याच्या घटना दुर्मिळ आहेत.
 
उड्डाण विषयक वार्ताहर डेव्हिड लिव्हरमाउंट यांचं म्हणणं आहे, "अशा प्रकारच्या प्रवासात जिवंत वाचणं फारच कठीण आहे."
 
अशा विमान प्रवासात नेमकं काय घडतं?
लिव्हरमाउंट यांनी बीबीसीला सांगितलं, "लँडिंग गिअरच्या जागी लपून बसून विनातिकीट प्रवास करण्यातला सर्वांत मोठा धोका म्हणजे टेकऑफ केल्यानंतर विमानाची चाकं जेव्हा आत येतात, तेव्हा त्यांच्याखाली चिरडून मृत्यू होण्याची दाट शक्यता असते."
 
ते सांगतात, उन्हाळ्याच्या दिवसात चाकांच्या ब्रेकचं तापमान सर्वाधिक असतं. त्यामुळे जळून मृत्यू होण्याचा मोठा धोका असतो.
 
तुम्ही यातूनही बचावलात तर तुम्हाला हायपोथर्मिया म्हणजेच कमी तापमान आणि ऑक्सिजनचा तुटवडा, यांचा सामना करावा लागू शकतो.
 
लिव्हरमाउंट सांगतात या जागी केबिनमध्ये असतो एसी नसतो, त्यामुळे इथलं तापमान खूप वेगळं असतं.
 
लांब पल्ल्याच्या प्रवासात विमान खूप उंचीवरून उडतं. अशावेळी लँडिंग गिअरचं तापमान उणे 50 अंश ते उणे 60 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं.
 
हाडं गोठवणारी थंडी तर असतेच, शिवाय इतक्या उंचीवर ऑक्सिजन फार कमी असतो. हवेचा दाबही कमी असतो. अशा परिस्थितीत फुफ्फुसांना खूप मेहनत करावी लागते आणि जवळपास शून्य ऑक्सिजन असलेल्या वातावरणात श्वास घेणं खूप कठीण होतं.
 
अशा प्रकारच्या उड्डाणांवेळी लँडिंग गेअरमध्ये प्रवास करणारे विनातिकीट ते प्रवासी जे कसेबसे बचावतात त्यांना लँडिंगच्या वेळी खूप सावधगिरी बाळगावी लागते. विमान लँडिंगची तयारी करत असतं तेव्हा चाकं असणारा भाग उघडतो. यावेळी प्रवाशाला अत्यंत सावध असावं लागतं.
 
लिव्हरमाउंट सांगतात, "बहुतांश प्रवासी याचवेळी खाली कोसळतात, कारण यावेळी ते धोकादायक स्थितीत असतात. असं यामुळेही घडतं कारण यावेळपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला असतो किंवा ते बेशुद्ध झालेले असतात. त्यामुळे त्यांची पकड सैल झालेली असते."
 
असा जीवघेणा प्रवास करतं तरी कोण?
"टेक ऑफच्या आधी संपूर्ण विमानाची तपासणी होते. सामान्यपणे ही तपासणी ग्राउंड स्टाफ, क्रू मेंबर किंवा काही वेळा दोघेही करतात," असं लिव्हरमाउंट सांगतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अगदी शेवटच्या क्षणीच कुणी इथे लपून बसू शकतं.
 
लिव्हरमाउंट यांच्या मते सर्वाधिक शक्यता त्या लोकांची असते जे अशा संवेदनशील वेळी विमानापर्यंत पोहोचू शकतात. उदाहरणार्थ अकुशल ग्राउंड स्टाफ किंवा अशा व्यक्ती ज्यांची क्लिअरंस स्टाफशी ओळख असते.
 
किती जण बचावतात?
उड्डाण विषयक जाणकार अॅलेस्टेअर रॉझनशीन सांगतात, "अशा परिस्थितीत बचावण्याची शक्यता अजिबात नसते किंवा जवळपास शून्य असते."
 
अमेरिकेच्या सांघिक उड्डाण प्राधिकरणाने 1947 ते 2 जुलै 2019 या काळात घडलेल्या अशा घटनांची आकडेवारी गोळा केली आहे. या दरम्यान प्राधिकरणाने 112 उड्डाणांशी संबंधित 126 प्रकरणं नोंदवली आहेत.
 
यात आढळलं की विनातिकीट प्रवास करणाऱ्या 126 प्रवाशांपैकी 98 जणांचा मृत्यू झाला तर 28 जणं थोडक्यात बचावले. मात्र विमानतळावर पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली.
 
बहुतांश मृत्यू लँडिंग किंवा टेकऑफच्या दरम्यान पडल्यामुळे झाले तर काही प्रकरणांमध्ये लोक चाकांमध्ये चिरडले गेल्याने मरण पावले.
 
प्राधिकारणाच्या आकडेवारीनुसार, "40 वेगवेगळ्या देशांमध्ये अशा घटना घडल्या. यात सर्वाधिक घटना क्युबा (9), त्यानंतर चीन (7), डॉमनिक रिपब्लिक (8), दक्षिण आफ्रिका (6) आणि नायजेरिया (6) घडल्या."
 
आकाशातून पडून मृत्यू
हिथ्रो विमानतळाजवळ विमानातून लपून प्रवास करताना मृत्यू होऊन मृतदेह खाली पडण्याची ही पहिली घटना नाही.
 
जून 2015 मध्ये लंडनमधल्या व्यावसायिक भागात एका छतावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. नंतर कळलं की तो 427 मीटर उंचीवरून पडला आहे. त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी अत्यंत गंभीर अवस्थेत सापडला होता. हे दोघंही ब्रिटिश एअरवेजने जोहान्सबर्गवरून लपून प्रवास करत होते.
 
या घटनेच्या तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2012 मध्ये मोझांबिकच्या एका नागरिकाचा मृतदेह लंडनच्या रस्त्यावर आढळला होता.
 
अंगोलाहून हिथ्रोला येणाऱ्या एका विमानातून तो पडला होता. त्याच वर्षी आणखी एका व्यक्तीचा हिथ्रोजवळ पडून मृत्यू झाला होता. तो केपटाऊनहून येणाऱ्या विमानात लपून प्रवास करत होता.
 
या जीवघेण्या प्रवासात किती जण बचावले?
जाणकारांच्या मते अशा प्रवासात मृत्यू अटळ आहे. तरीही काही अपवाद आहेत.
 
मात्र बचावलेल्यांना गंभीर जखमा झाल्या. दुखापत झालेला हाथ किंवा पाय कापण्याचीही वेळ अनेकांवर आली.
 
लहान पल्ल्याच्या किंवा कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानात बचावण्याची शक्यता अधिक असते.
 
2010 साली 20 वर्षांचा रोमानियाचा तरुण व्हिएन्नाहून उड्डाण करणाऱ्या एका प्रायव्हेट जेटमधून हिथ्रोला पोहोचण्यात यशस्वी झाला.
 
2015 साली जोहान्सबर्गहून हिथ्रोपर्यंत 12,875 किलोमीटरचा प्रवास करणारी एक व्यक्ती लँडिंग गेअरमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली होती.
 
बचावलेल्या व्यक्ती
1969 - 22 वर्षांचे अर्मांडो सोकारास रमिरेज क्युबामधल्या हवानाहून मॅड्रिडला सुखरूप पोचले.
 
1996 - 23 वर्षांचे प्रदीप सैनी दिल्लीहून लंडनच्या 10 तासांच्या प्रवासात बचावले. मात्र, त्यांचे भाऊ विजय यांचा हिथ्रो एअरपोर्टजवळ पडून मृत्यू झाला.
 
2000 - तेहितीहून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या बोईंग 747च्या 4000 मैलांच्या उड्डाणात फिडेल मारुही बचावले.
 
2002 - क्युबाहून कॅनडाच्या मॉन्ट्रियलपर्यंत चार तासांच्या उड्डाणात 22 वर्षांचे व्हिक्टर अल्वारोज मोलिना जिवंत बचावले.
 
2014 - कॅलिफोर्नियातल्या सॅन जोशे विमानतळाहून हवाईच्या माउईपर्यंत बोईंग 767च्या लँडिंग गेअरमध्ये प्रवास करणारा 15 वर्षांचा याहया आब्दी हा तरुण बचावला होता.