शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

केन विल्यमसन: वर्ल्ड कप 2019 गमावूनही जग जिंकणारा न्यूझीलंडचा कर्णधार

- पराग फाटक
रविवारी न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमने याचा पुरेपूर अनुभव घेतला. हातातोंडाशी आलेला वर्ल्ड कप त्यांच्या हातून निसटला. चार वर्षांपूर्वी ते उपविजेते होते आणि यंदाही उपविजेतेच राहिले. त्यांनी मॅचमध्ये, सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडएवढ्याच धावा केल्या. मात्र सर्वाधिक चौकारांच्या बळावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.
 
हुकलेला कॅच, ओव्हरथ्रोमुळे गमावलेले रन्स, रनआऊट्स अशा हिंदोळ्यातून न्यूझीलंडचं जेतेपद हरवलं. परिस्थिती अगतिक व्हावी अशी.
 
चिडचिड करावी, थयथयाट करावा, शिव्यांची लाखोली वाहावी, कोणावर तरी राग काढावा अशा वातावरणात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अविचल होता. ऋषीमुनींसारखी दाढी ठेवणाऱ्या केनच्या चेहऱ्यावर निरलस शांतता होती. तासाभरापूर्वी हा माणूस अगम्य कल्लोळाच्या केंद्रस्थानी होता, याचा मागमूसही त्याच्या तेजपुंज चेहऱ्यावर नव्हता.
 
सर्वस्व पणाला लावूनही ध्येयप्राप्ती न झाल्याने अश्रूंना वाट मोकळी करून देणं साहजिक होतं. परंतु केन यासगळ्याच्या पल्याड पोहोचला होता. फळाची अपेक्षा न धरता काम करत राहावं, या उक्तीचा पाईक असल्यासारखा केन पुरस्कार सोहळ्यात तटस्थपणे सगळं पाहत होता. कोणतीही कटुता नाही.
 
दाढीवर हात फिरवता फिरवता केन थोडं हसलाही. मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार केनला जाहीर झाला तेव्हा "मी?" असं त्याने आश्चर्यचकित होत विचारलं.
 
इंग्लंडचा संघ जेतेपदासह जल्लोष करत होता तेव्हा केनची पत्रकार परिषद सुरू झाली होती. एकामागोमाग एक प्रश्न येत होते. केनची उत्तरं टिपून ठेवावी अशी.
 
"राग कसला मानायचा? निराशा आहे. प्रत्येकाने शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. झुंजलो. आपल्या नियंत्रणात नाही, अशा काही गोष्टी असतात. मोक्याच्या क्षणी असं काही झालं तर आपल्या हातात फार काही उरत नाही. प्रयत्न करणं आपल्या हाती आहे. आम्ही तेच केलं.
 
"गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. वर्ल्ड कप खेळण्याची संधी सहजासहजी मिळत नाही. हा पराभव पचवणं सोपं नाही. पण मला इंग्लंडचं विजयाचं श्रेय घ्यायचं नाहीये. नियम स्पर्धेआधीच ठरवण्यात आले होते. टाय, सुपर ओव्हर म्हणजे मॅच नव्हे. मॅचमध्ये अनेक छोटे प्रसंग असतात.
 
"इथेच थांबून चालणार नाही. न्यूझीलंडसाठी खेळणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफने जीव तोडून प्रयत्न केले. जेतेपद मिळवू शकलो नाही. प्रयत्न करत राहणं आमच्या हाती आहे," असं तो म्हणाला.
 
पत्रकार परिषदेतला शेवटच्या प्रश्नाने केन खुलला. "खेळाइतकंच न्यूझीलंडने जी खेळभावना दाखवली त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तू स्वत: संघासमोर, चाहत्यांसमोर कसं वागावं याचा वस्तुपाठ सादर केला आहेस. तुझ्यासारखं सगळ्यांनी जंटलमन व्हावं का?" असा प्रश्न येताच केन मिश्कील हसला आणि म्हणाला, "प्रत्येकाने स्वत:सारखं वागावं. ते जगासाठी चांगलं आहे. सगळ्यांनी सारखं असू नये. या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. हेच माझं उत्तर असेल. तुम्ही स्वत: जसे आहात तसेच राहा. तुम्ही जे करताय त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा."
 
केनचं उत्तर पूर्ण होताच पत्रकार परिषद संपली आणि पत्रकारांनी केनला स्टँडिंग ओव्हेशन दिलं. पत्रकार परिषद हा औपचारिक प्रकार असतो. त्यात भावनिक होण्यासारखं काही नाही. पण आठ तासांची मॅच आणि त्यानंतर दीड तास चाललेल्या थरारात वर्ल्ड कप निसटूनही केनचा जगण्याचा दृष्टिकोन बदलला नाही.
 
अगदी शांतपणे आणि खरेपणाने त्याने सगळी उत्तरं दिली. कलाकृती भावल्यानंतर चाहते कलाकारांना उभं राहून अभिवादन करतात. क्रिकेटच्या पटावरचा महासंग्राम गमावूनही केनला स्टँडिंगला मिळालं यातच त्याचं मोठेपण दडलं आहे.
 
केनने नऊ वर्षांपूर्वी न्यूझीलंडसाठी पदार्पण केलं. तेव्हापासून तो जगभर धावा करतोय. दमदार कामगिरीमुळे त्याला संघातून डच्चू मिळण्याचा प्रश्नच उद्भभवलेला नाही. अगदी अल्पावधीत तो न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा झाला. त्यामुळे ब्रेंडन मॅक्क्युलमकडून केनच्या हाती न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा अगदी सहजतेने आली.
 
जगभरात सगळीकडे, जिवंत खेळपट्यांवर, दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध केन धावांची टांकसाळ उघडतो. अहमदाबादचा प्रचंड उकाडा असो किंवा वेस्ट इंडिजमधल्या भंबेरी उडवणाऱ्या खेळपट्या - केनचं धावा करण्याचं व्रत अखंडित सुरू राहतं. टेस्ट असो किंवा वनडे, केनचा धावांचा यज्ञ प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणतो.
 
राहुल द्रविडच्या शैलीतलं क्रिकेट खेळणारा केन ट्वेन्टी-20 खेळू शकणार नाही, असा होरा होता. मात्र केनने तिथेही आपली उपयुक्तता सिद्ध करत टीकाकारांना निरुत्तर केलं. 'फास्टफूड क्रिकेट' म्हणून संभावना होणाऱ्या IPL स्पर्धेत केन धावांची रास ओततो. सध्या तो सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्व करतो.
 
खेळायला लागल्यापासून केनला कुणीही आक्रस्ताळं वागताना बघितलेलं नाही. शतकी खेळीनंतरही तो स्थिर असतो. कोणतंही वाईल्ड सेलिब्रेशन नाही. प्रेक्षकांना आणि ड्रेसिंग रूमला अभिवादन करतो, पुन्हा हेल्मेट चढवून खेळायला लागतो. गेमप्लॅनचा भाग म्हणून प्रतिस्पर्ध्यांना उकसवण्यासाठी शिव्या वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. चर्चेत राहण्यासाठी हल्ली अनेक क्रिकेटपटू अतरंगी क्लृप्त्या योजतात. केनला त्याची गरज पडत नाही. त्याचे कट्टर प्रतिस्पर्धीही त्याच्याविषयी वाईट बोलत नाहीत.
 
खेळ करमणुकीचं साधन असण्याचा काळ केव्हाच सरला. खेळांवर एक प्रचंड मोठं अर्थकारण बेतलेलं असतं. खेळाडू स्वत: एक ब्रँड असतात. जाहिराती, इव्हेंट, करार असा सगळा पसारा असतो. हारजीत सगळं समीकरणं बदलून टाकतं. चांगलं खेळण्याइतकाच नेहमी जिंकण्याचा दबाव असतो. केन त्याला अपवाद नाही.
 
पण या सगळ्या कल्लोळातही केन परीटघडीचा पोशाखी ठरत नाही. सच्चेपणाची नक्कल त्याला करावी लागत नाही. आपण बरं, आपलं काम बरं या न्यायाने तो जगत राहतो. क्रिकेट खेळणारे अनेकजण आहेत. खेळाडू म्हणून अनेकजण ठसा उमटवतात. परंतु माणूस म्हणून योगदान देणारे विरळच. केन या गटाचा पाईक आहे.
 
केनचा हा तिसरा वर्ल्ड कप. 2011मध्ये सेमी फायनल, 2015 मध्ये उपविजेते, 2019मध्ये उपविजेते असा न्यूझीलंडचा प्रवास आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कार केनने पटकावला.
 
न्यूझीलंड संघातील बाकी खेळाडूंच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक धावा केननेच केल्या आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड कपबाहेर करण्यात केनच्या चतुर नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. फायनलमध्येही केन आणि न्यूझीलंडने सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र रुढार्थाने न हरताही जेतेपद त्यांच्यापासून दूर राहिलं.
 
खेळामागचा विचार जगणारा केन म्हणून महत्त्वाचा आहे. दमवणाऱ्या वर्ल्ड कप फायनलचा लसावि म्हणजे केनचं वागणं होतं. क्रिकेटला बहरायचं असेल तर केन प्रवृत्ती रुजायला हवी.