सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 17 जून 2019 (11:15 IST)

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा : आक्रमकता की शिवसेनेची हतबलता?

चारपाच ढोलवाले ढोल वाजवत येत आहेत, त्यांच्याबरोबर 20-25 शिवसैनिक घोषणा देत येत आहेत आणि त्यांच्या गराड्यात काही शिवसेनेचे खासदार दिसत आहेत. हे चित्र आहे अयोध्येतल्या रामजन्मभूमी स्थळाचं.
 
ज्या क्षणी ढोलचा आवाज यायला सुरुवात झाली त्याच क्षणी उपस्थित मीडियाच्या लोकांमध्ये धांदल उडाली. पोलीस सुद्धा त्यांच्या त्यांच्या पोझिशनमध्ये आले आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या अयोध्या दौऱ्याला किंबहुना भेटीला सुरुवात झाली.
 
साधारण 100-150 पोलीस, तेवढेच पत्रकार आणि तेवढेच शिवसैनिक किंवा दौरा पाहायला आलेली माणसं. असं एकंदर चित्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं पाहायला मिळालं.
 
कुठलीही मोठी होर्डिंगबाजी नाही, मोठे मंडप नाहीत, सभा नाही की आरती किंवा इतर कुठलेही कार्यक्रम नाहीत. उद्धव ठाकरे त्यांच्या 18 खासदारांसह राम मंदिराच्या मुख्यस्थळी मोजून 20 मिनिटं होते. मीडियाला आत जाण्याची परवानगी नसल्यानं तिथं त्या 20 मिनिटांमध्ये त्यांनी नेमकं काय केलं हे काही सांगता यायचं नाही.
 
मागील दौऱ्यावेळी लखनऊ-अयोध्या हायवेपासूनच शिवसेनेचे होर्डिंग दिसत होते. अभूतपूर्व सुरक्षा होती. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले होते. अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षेची साक्ष देण्यासाठी पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते. यावेळी यातलं काहीच दिसलं नाही.
 
चार तासात आटोपला दौरा
उद्धव ठाकरे यांची ही अयोध्या भेट अवघ्या चारच तासांची होती. साडेआठला अयोध्येत आलेले उद्धव ठाकरे साडेबाराला मुंबईसाठी रवानासुद्धा झाले. अर्थात जाता जाता अदित्य ठाकरे मीडियाला म्हणाले, की आधी मंदिर मग इंडिया पाकिस्तान मॅच.
 
ज्या दिवशी हा दौरा झाला तो दिवस मीडियासाठी खूपच भरगच्च बातम्यांचा. उद्धव ठाकरेंचा दौरा, मंत्रिंमडळ विस्तार आणि मग त्यानंतर लगेचच इंडिया-पाकिस्तानची मॅच.
 
एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत असं चित्र टीव्हीवर दिसत होतं. नेमकं काय दाखवावं या पेचात पडलेल्या मीडियानं दोन्ही गोष्टी टू विन्डो करून चालवल्या. पण काही क्षणातच मंत्रिमंडळ विस्तार संपला आणि त्यामागोमाग लगचेच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदसुद्धा. नेमकं टायमिंग चुकलं बघा. त्यातही या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हिंदीत बोलणंच पसंत केलं. जास्तीत जास्त राष्ट्रीय मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.
 
त्यावर आणखी कडी म्हणजे उद्धव ठाकरे जाताच शिवसेनेच्या खासदारांनी उपस्थित मराठी टीव्ही मीडियाच्या प्रतिनिधींना भारत-पाकिस्तान मॅचवर त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली.
 
दौऱ्याचा फ्लॉप शो?
गेल्यावेळी एक हिट शो देणाऱ्या उद्धव ठाकरेंचा हा दौरा मात्र अपयशी का ठरला? त्यांच्या दौऱ्याच्या दिवशीच मंत्रिमंडळ विस्तार का ठेवण्यात आला? तो पुढे किवा मागे करता आला नसता का? भारत-पाकिस्तानची मॅच त्याच दिवशी आहे हे लक्षात येऊन दौरासुद्धा मागेपुढे करता आला नसता का? की उद्धव ठाकरे यांनाच हा शो फ्लॉप झालेला पाहिजे होता?
 
उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची अशी कुठली हतबलता आहे की त्यांना ही अशी फारशी चर्चा न होणारी, आटोपशीर तसंच 'मम' म्हणणारी भेट द्यावी लागली?
 
तर त्याचं उत्तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आहे.
 
यंदाच्या लोकसभेआधी भाजपला स्वतःलाही 303 जागा येण्याचा अंदाज नव्हता. त्यातच शिवसेनेनं त्यांना महाराष्ट्रात जहरी टीका करून आणि अयोध्या दौरा करून राम मंदिराच्या मुद्द्यावर जेरीला आणलं होतं. उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना मातोश्रीवर येण्यास भाग पाडलं होतं.
 
पण आता मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. भाजपला शिवसेनेची गरज नाही. मंत्रिमडळातील खातेवाटप असेल किंवा मग शिवसेनेनं केलेल्या उपसभापतीपदाच्या मागणीकडे भाजपनं केलेलं दुर्लक्ष असेल. भाजपनं शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.
 
त्यातच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची घोषणा होताच विश्व हिंदू परिषदेनं यंदा सुद्धा गेल्यावेळे प्रमाणे संत-महंतांचं संमेलन आयोजित केलं होतं. शिवसेनेनं त्यांचा कार्यक्रम फार मोठा ठेवला नसल्यानं त्यांनी सुद्धा भव्य आयोजन टाळलं.
 
शिवसेनेची हतबलता
पण उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मात्र या संमेलनाला हजेरी लावली आणि राममंदिर हा भाजपचाच मुद्दा असल्याचं ठासून सांगितलं. आपसात चर्चा करून किंवा कोर्टानं दिलेल्या निकालानुसार राममंदिराच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल असं त्यांनी सांगितलं. पण त्यातूनही जर काही झालं नाही तर सरकार त्यासाठी अध्यादेश आणेल असं सूतोवाच त्यांनी केलं.
 
एक प्रकारे उद्धव ठाकरे काय मागणी करू शकतात किंवा काय बोलू शकतात हे लक्षात घेऊनच मौर्य बोलले. त्याच्याच हेडलाईन स्थानिक वृत्तपत्रांमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या दिवशी छापून आल्या.
 
एक प्रकारे उत्तर प्रदेश भाजपनं उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला.
 
शिवसेनेनं ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या या भेटीचा टोन डाऊन केला त्यावरून तरी युतीच गरज त्यांनाच आहे हे यातून दिसतंय. पण, नेहमीप्रमाणे आपलं उपद्रवमूल्य कसं जास्त किंवा मोठं आहे किंबहुना ते कसं राष्ट्रीय पातळीवर भाजपला कोंडीत पकडू शकतं हे दाखवण्याची संधी या माध्यमातून शिवसेनेनं घेतली आहे.
 
भविष्यातही शिवसेना या आयुधाचा वापर भाजपविरोधात करेल असंच दिसतंय.

नीलेश धोत्रे