मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (12:52 IST)

उभ्या गौरी

तुमच्याकडे उभ्याच्या गौरी आहेत न ग, बापरे केवढं करावं लागतं-असे dialogueऐकू यायला लागले की समजावं की गौरी, गणपती जवळ आलेत
 
गणपती कितीही दिवस असला तरी बाप्पाना आपले मोदक केले की झालं, ते काही बिचारे एवढं सगळं मागत नाहीत. मोदकाचा नैवैद्य मिळाला की खूष.
 
ज्यांच्या सासर माहेरी उभ्या गौरी असतात त्यांचं लग्न झालं की सासूबाईचा dialogue ठरलेला, यावेळी मदतीला आहे ही, नाहीतर मी एकटीच करत होते. दुसरीकडे आई चिंतेत. आता माझं कस होणार?
 
ज्यांच्या सासरी उभ्या गौरी असतात आणि माहेरी नाही, त्यांना ह्या गौरी जेवणाची इतकी भिती असते काही विचारू नका.पण पहिलं वर्ष झालं की मग त्यापण सरावतात.
ज्यांच्या फक्त माहेरी उभ्या गौरी असतात आणि सासरी नाही, त्यांची मजा. 2 दिवस माहेरपण फिक्स. हौस भागते पण जबाबदारी आई घेते.आहे न मजा.
 
उभ्या गौरी म्हणलं की तयारी काही विचारू नका. सगळ्यात आधी एक दोन महिने कपाटातल्या साड्या हुडकायला सुरवात होते. कुठली साडी नेसवायची? कसबस 1 साडी आपण निवडतो आणि दुसरीच्या खरेदीला बाहेर पडतो. दुकानात जाताना ती घरची साडी बरोबर नेतो सुद्धा. अहो ह्याला जोडी शोभेल अशी दाखवा अशी पहिली मागणी दुकानदाराला केली जाते. हळूहळू साड्यांचा ढीग पडतो पण जोडी मनास येत नाही. मग बहुदा बरोबर आलेली मैत्रीण म्हणते की अग त्यापेक्षा दोन्ही नव्याच घे की. मग मनातल्या मनात हिशोब सुरू. एकदाच असतात गौरी वर्षातून , होउदे खर्च, तेवढीच आपल्या आवडीची साडी घेता येईल. एक नणंदेला देऊ ती पण खूष. अशी एकदा मनासारखी साडी झाली की मग जरा मूड येतो. नंतर गौरीची सवाष्ण, तिची शोधाशोध. प्रत्येकीला आपल्या माहेरी जायचं असत किंवा स्वतःकडे तरी असतात, त्यामुळे आधी बुक करावी लागते, आणि दोनदोन वेळा फोन करून आठवण पण करून द्यावी लागते. हे कधी जेव्हा नणंद बाहेरगावी असेल तरचा प्रश्न.
 
घर आवरणे,बाकीची तयारी हे सर्व 2, 3 दिवस आधी होत. गणपतीचे दोन दिवस मग आरास, मोदक ह्यात जातात. ते झालं की मग खरा जोर येतो गौरीच्या तयारीसाठी.
 
कितीही प्लॅंनिंग केलं तरी आयत्यावेळी काहितरी धावत जाऊन आणावच लागत.
आणि finally गौरी यायचा मुहूर्त बरोबर गाठला जातो. साड्या नेसवण फार कठीण. एखादंवेळी अर्ध्यातासात होणार काम कधीकधी 2 तास लावून जात. मग मनात नाना विचार, काही चुकलंय का यंदा, अस कस होतंय? तेवढ्यात मदतीला हक्काची शेजारीण / जाऊ किंवा नणंद येते आणि वहिनी तुम्ही बसा 5 मिनिटं मी करते अस म्हणते आणि झटकन गौरी बसतात. खर तर त्या उभ्या असतात, पण म्हणताना आपण बसल्या असच म्हणतो. मग रात्री फोनवर बोलायला वेळ नसला तरी गौरी कधी बसल्या ह्या चौकशीसाठी आलेला फोन सर्व कहाणी सांगूनच ठेवला जातो.
 
प्रत्यक्ष गौरी जेवणादिवशी तर विचारूच नका. प्रत्येक जण 10 हाताच काम करत असते.एकीकडे तोंडाचा पट्टा पण चालू. कामवाल्या मावशीपण सुट्टीवर, त्यांच्या गौरीं साठी, हाल विचारू नका.
पण मूलं जरा लांबच असतात आईपासून. त्यादिवशी त्यांचा कुठलाही हट्ट पुरवला जाणार नाही हे त्यांनाही पक्के ठाऊक असते. गौरीजेवण, एकच लक्ष्य.
सर्व तयारीमुळे जेवण यथासांग पार पडत.
पण हे होईतो 4 वाजतात. मग संध्याकाळची तयारी. दहा मिनिटे बसावं असा विचार येतो आणि तितक्यात कोणीतरी चारलाच येत. बर बोलणार काय?सगळ्याना आपणच संगीतलेलं की कधीही या हो सोयींनी. आपला पूर्ण अवतार.मग तसंच हसून स्वागत. रात्री 9 ला मधेच आरती करून, मुलांना जेवायला घालायचं.ती पण कंटाळलेली आणि पूर्ण दिवस सगळीकडे उधळून दमलेली.
11 ला मात्र सर्व अवसान संपत आणि पाठ टेकली जाते, ओट्यावरचा पसारा दिसत असूनही कानाडोळा करतो. आडवं पडलं तरी सगळे येऊन गेलेल्या लोकांची आठवण काढतच झोप लागते, अगदी समाधानाने.
 
गौरीची पाठवणी मात्र दरवर्षी डोळे ओले करून जाते. परगावी सासरी निघालेली लेक आणि गौरी यात अगदी साम्य.प्रत्येकवेळी जाताना मन तेवढंच हळवं होत. विसर्जनाला जाताना पाय रेटतच जातो बहुतेक वेळा.
 
खर सांगू का , मी गौरीच्या हळदी कुंकवाला जाते ते त्या मुखवट्याच्या गौरी पाहायला नाही तर त्या गौरी मनापासून सजवणाऱ्या आणि त्यासाठी दिवस रात्र खपून दमल्या तरीही अगदी उत्साहाने स्वागत करणाऱ्या सर्वांनसाठी. अस वाटत खऱ्या गौरी देखील पृथ्वीवर एक दिवस येत असाव्यात आणि पाय निघत नसेल म्हणून 3 दिवस यांच्याबरोबर रेंगाळतात.