शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2020 (15:14 IST)

यज्ञोपवीत (जानवे) का धारण करावे..

षोडश संस्कारात 'उपनयन' हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. संस्कार शिवाय जीवन तेजस्वी बनत नाही. सोन्यालाही तेज आण्यासाठी मुशीत घालावे लागते. उपनयन संस्कारामुळे जीवन तेजस्वी बनण्यास मदत होते. याच संस्काराच्या वेळी बटूच्या गळ्यात यज्ञोपवीत घालून त्याला महा सामर्थ्यशाली गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते. 
 
यज्ञोपवीत हे वैदिक जीवन धारणेचे प्रतीक आहे. या यज्ञोपवीत नऊ तंतूवर नऊ वेगवेगळ्या देवतांची स्थापना केलेली असते. या देवता म्हणजे ॐकार, अग्नी, नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, यम आणि विश्व देवता. यज्ञोपवीत हे नेहमी या देवतांची आठवण देते. परमेश्वर सतत माझ्या जवळच आहे, याचे स्मरण हे यज्ञोपवीत देत असते नि त्यामुळेच जीवन संग्रामाला तोंड देताना मानवात एक प्रकारचा आत्मविश्वात निर्माण होतो. 
 
यज्ञोपवीताच्या या नऊ तंतूंना तिनात गुंफून त्रिसूत्री बनविण्यात येते आणि या सूत्रांवर अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांची स्थापना केली जाते. त्यानंतर या  तिघांची गाठ मारण्यात येते. तिला 'ब्रम्हगाठ' असे म्हणतात.
 
यज्ञोपवीत धारण केल्याने बुद्धीचे प्रज्ञेत परिवर्तन होते. त्याचा सान्निध्यात ईश्वराची सतत आठवण राहते. श्रावणातील पौर्णिमेला जुने यज्ञोपवीत बदलून नवे धारण करावयाचे असते. यालाच 'श्रावणी' ते नाव आहे. (सोयर - सुतकानंतरही यज्ञोपवीत बदलावे लागते.) यावेळी विश्व नित्याला प्रार्थना करायची की 'मला अजून भगवंताचे खूप कार्य करायचे आहे, अनेक सत्कृत्ये करायची बाकी आहेत. यासाठी मला आणखी एका वर्षाचे तरी आयुष्य दे.'
 
आजच्या काळात मुलांना यज्ञोपवीत घालण्याची लाज वाटते. जी मोठी माणसे यज्ञोपवीत घालतात, ती त्याचा उपयोग फक्त किल्ली अडकविण्यासाठी करतात कारण त्यांना यज्ञोपवीताचे महत्त्व ठाऊक नसते. ते त्यांनी समजावून घेतले, तर यज्ञोपवीतातील सामर्थ्य त्यांचा लक्षात येऊ शकेल.