गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सेऊल , शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017 (08:21 IST)

ट्रम्प यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे : उत्तर कोरिया

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांचा अवमान केल्याने त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे अशी जळजळीत प्रतिक्रीया उत्तर कोरियाकडून नोंदवण्यात आली आहे. आपल्या दक्षिण कोरिया भेटीत उत्तर कोरीयाच्या सीमेवर येण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही आमच्या सैनिकांना घाबरून त्यांनी तेथून पळ काढला असाही अन्वयार्थ त्या देशाने लावला आहे.
 
उत्तर कोरियाच्या सरकारी मालकीच्या दैनिकातील अग्रलेखात या प्रतिक्रीया नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की आमच्या देशाच्या सर्वोच्च नेत्याविषयी अवमानकारक भाषा त्यांनी वापरली असल्याने आमची जनता त्यांना कदापिही माफ करणार नाहीं. त्यांनी हा जो गुन्हा केला आहे त्याबद्दल त्यांना फाशीच दिली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी एका ट्विट मध्ये असे म्हटले होते की किम जोंग यांनी मला म्हातारा का म्हणावे, मी त्यांना जाड्या आणि बुटका म्हणालो नव्हतो. त्यांच्या या ट्विटवर आधारीत त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
 
दक्षिण कोरियाला भेट देणारे अमेरिकेचे उच्चपदस्थ नेहमी उत्तर व दक्षिण कोरीयाच्या लष्करीकरण नसलेल्या सीमा भागाला भेट देतात. पण या भागाला भेट देण्याचे ट्रम्प यांनी टाळले याचा संदर्भ देऊन या दैनिकाने म्हटले आहे की ट्रम्प आम्हाला घाबरून तेथून पळून गेले. आमच्या सैनिकांच्या नजरेला नजर भीडवण्याची ताकद त्यांच्याकडे नाहीं. दरम्यान त्याविषयी खुलासा करताना अमेरिकेने म्हटले आहे की अध्यक्ष ट्रम्प हेलिकॉप्टरने त्या भागाला भेट देण्यासाठी निघाले होते पण पाचच मिनीटात खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तेथून परत आले. तथापी अमेरिकेने केलेला हा खुलासा खोटा आणि हास्यास्पद असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.