शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2018 (08:57 IST)

पुणे : अ‍ॅमेझॉनला 51 लाखांचा गंडा

पुण्यात तत्काळ डिलिव्हरीसाठी अ‍ॅमेझॉन कंपनीने विमानाने मागविलेल्या 51 लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर महागड्या वस्तू मध्येच अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेझॉनचे सिक्युरिटी प्रिव्हेन्शन मॅनेजर प्रणव गोपाळ बोराळे (33, रा. कलम ग्रीन लीफ, किरकीटवाडी) यांनी तक्रार दिली आहे. 

अमेझॉन कंपनीकडे तत्काळ डिलिव्हरीची मागणी झाल्यानंतर संबंधित उत्पादने विमानाने मागविली जातात. ज्या शहरातून पार्सल येणार आहे त्या ठिकाणच्या विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव अमेझॉनची पार्सल फोडून त्यात काय आहे, हे तपासले जाते. त्यानंतर पार्सल पुन्हा पॅक करून पाठविले जाते. सुरक्षेच्या कारणास्तव नाकारलेले पार्सल रस्तामार्गे पाठविले जाते. त्यामुळे विमानतळावर प्रत्यक्ष किती आले याची पाहणी केली जाते. अमेझॉन कंपनीने काही वस्तू पार्सल पाठविले होते. लोहगाव विमानतळावर यातील काही पार्सल कमी असल्याचे आढळून आल्यानंतर चौकशी केली गेली. यात  गेल्या सहा महिन्यांत गहाळ असलेल्या वस्तूंची चौकशी केली. त्या वेळी वस्तू मध्येच कोणीतरी काढून घेतल्या असल्याचे समोर आले. पाच एप्रिल ते 29 नोव्हेंबरदरम्यान 232 मोबाईल, इतर वस्तू असा 51 लाख 11 हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या असल्याचे समोर आले.