शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (10:23 IST)

टिकटॉकवर बंदी हवीच : एकाचा गेला जीव तर दोघे तुरुंगात

सोशल मिडीया किती आणि कसा वापरावा हे आता सांगणे फार गरजेचे झाले आहे. शुल्लक आणि लवकर प्रसिद्धीसाठी तरुण कोणत्याही थराला जात असून त्यातून अनेकांची आयुष्य उध्वस्त होत आहेत. असाच प्रकार शिर्डी येथे घडला आहे. यामध्ये एका तरुणाचा जीव गेला आणि दोघे तुरुंगात गेले आहे.
 
टिकटॉकवर अपलोड करण्यासाठी एकमेकांचा व्हिडीओ काढत असताना गावठी कट्ट्यातून गोळी सुटून छातीत लागल्याने प्रतीक वाडेकर या युवकाचा मृत्यू झाला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून गावठी कट्टादेखील ताब्यात घेण्यात आला आहे. हॉटेल पवनधाम येथील रूम नंबर १०४ मध्ये काही मुले फ्रेश होण्यासाठी गेली,  त्यावेळी गोळी लागून प्रतीक संतोष वाडेकर या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या सोबत आलेल्या मुलांनी तिथून लगेच पळ काढला. गोळीच्या आवाजाने हॉटेलचे मालक गोविंद गरुड सावध झाले. त्यांनी हॉटेल बाहेर पळणाऱ्या एका मुलाला पकडलं. मात्र त्यांना धमकावून तोही मुलगा पळून गेला होता. या गंभीर घटनेनंतर थोड्या वेळात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक अनिल कटके व सहकारी पोलीस उपनिरीक्षक पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वाकचौरे यांनी घटनास्थळी प्राथमिक माहिती घेऊन तसंच सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींच्या शोधासाठी तत्काळ तीन पथके पाठवली होती. आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक कटके यांना सदरचे आरोपी शहरातील रेल्वे स्टेशनलगत लपले होते असे समजले. पोलिसांनी लगेच  सनी पोपट पवार (वय २०, रा. धुळदेव, ता.फलटण, जि.सातारा) यास गावठी कट्टा व एका राऊंडसह ताब्यात घेतले. त्याचा सहकारी नितीन अशोक वाडेकर हा सुद्धा काही वेळातच पोलिसांना सापडला. विशेष म्हणजे मयत व आरोपी एकमेकांचे जवळचे नातलग आहेत.
 
यामध्ये सनी पवार याने टिकटॉक व्हिडीओ काढत असताना आपल्याकडून गोळी सुटून प्रतीकचा मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपीं अजून सापडला नाही. घटनास्थळावरून उडालेल्या राऊंडची पुंगळीही जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके पुढील तपास करत आहेत. त्यामुळे हा जीवघेणा टिकटॉकवर बंदी हवीच अशी मागणी आता जोर पकडत आहे.