शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

गुजराती भाषेच्या आक्रमणामुळे आज मराठी भाषा संकटात

श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या कर्मभूमीत आज मराठी माणूस मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी अक्षरशः तडफडतो आहे. मागील चाळीस वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकार गुजरातमधील मराठी माणसाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्यांकडे ढुंकूनही न पाहिल्याने येथील मराठी भाषा संकटात सापडली आहे. 
 
महाराष्ट्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे नाराज असलेली मराठी माणसे आज मराठी भाषेकडे पाठ फिरवली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मराठी संस्कृतीपासून दूर होत जाणारी ही चौथी पिढी आहे. गुर्जर भाषेच्या आक्रमाणामुळे मराठी भाषा संकट सापडल्याची दिसून येते. बडोदेला सयाजीनगरी या नावाने ओळखले जाते ही गोष्ट मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. महाराजा सयाजीरावांनी बडोदे संस्थानमध्ये मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यात जे योगदान दिले त्यास तोड नाही. 16 व 17 व्या शतकात मोघलांना येथून हुसकावून लावले. 1721 मध्ये बडोदा संस्थानची स्थापना करण्यात आली. ती नंतर इंग्रज राजवटीतही स्वायत्त संस्था म्हणून टिकून होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. आज खनिज तेलाच्या व्यवसायाने समृध्द झालेल्या बडोदेनगरीत मराठी माणूस स्थिरावला असला तरी तो मराठी संस्कृतीपासून परांगदा होत असल्याचे दिसून येते.
 
या संदर्भात बोलताना गुजरातमधील मराठी भाषक व चैतन्य मराठी संस्थासाठी समाजकार्य करीत असलेले तसेच राजभाषा सचिव असलेले राजेंद्र लुकतुके यांची भेट घेतले असता ते म्हणाले, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर पत्नीच्या नावाने बडोदे शहरात महाराणी चिमणाबाई माध्यमिक शाळा आहे. तिथे बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त आठ मराठी संस्था आहेत. येथे थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवले जातात. मराठी कार्यक्रम होतात. परंतु आज मराठी मुले हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषा शिकत आहेत.
 
बडोदे शहराची लोकसंख्या 20 लाख असून त्यात चार लाख मराठी भाषक आहेत. आजच्या पिढीली शुध्द मराठी बोलता येत नाही. यानंतरचा काळ मराठी भाषेसाठी अनुकूल असणार नाही असेच चित्र आहे. बडोदे शहरातील दांडिया बाजारात बहुसंख्य मराठी भाषक राहतात. येथील मराठी माणूस आनंदी असला तरी तो आज सांस्कृतिकदृष्ट्या पराधीन होत चालला आहे. या शहराने मराठीची ओळख कायम ठेवली असली तरी येथील मराठी माणसाची मराठी नाळतुटत आहे. आगामी काळात येथील मराठी माणसांसाठी महाराष्ट्र सरकारने ठोस उपाय योजले नाही तर मराठी माणूस गुजराती झाल्याशिवाय राहणार नाही.