गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मे 2018 (12:27 IST)

शब्दाचं गाव

बरेचदा अनेक प्रसंग, घटना, ठिकाणे, व्यक्ती, अनुभव खुणावत असतात. शब्दबद्ध होण्यासाठी. शब्द - या शब्दांमुळेच तर माणसाचं जग समृद्ध झालं आहे. अगदी शब्दमय झालं. शब्दांचं कोंदण मिळालं तरच भावना व्यक्त होऊ शकते आणि संवादाचं माध्यम होऊ शकते. खुणावणारे आणि खुलवणारे असे अनेक अनुभव शब्दबद्ध होण्यास आतूर असूनही शब्दांनीच मला त्यांच्या गावाला न्यायचं ठरवलं.
 
शब्दांची इच्छा - त्यांच्या इच्छेपुढे कुणाचेच काही चालत नाही. शब्दांच्या गावात जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा चोहीकडे केवळ शब्दच फिरत होते. काही आपल्या मायमराठीतले तर काही इतर प्रांतातले व देशातले. त्या गावात प्रत्येक भाषेच्या वसाहती होत. खरंतर माराठीच वसाहतीत प्रथमतः जाण्याचा खूप मोह होत होता. पावलं तिथे वळली देखील पण आवरली. कारण मनात विचार केला की, इतर भाषांच्या नगरातून वा वसाहतीतून एक फेरफटका तरी मारावा. भाषा, लिपी वेगळी, अर्थ वेगळे. काहीही न कळणारे, नक्षीसारखे वाटत असले तरी शब्द आहेत ते. काही कळो अथवा न कळो पण प्रत्येक नगरातून वा वसाहतीतून एक नजर टाकावी असे ठरवले. फार गंमत येत होती अशा शब्दांच्या जगातून फिरताना. जे काहीच कळत नाहीत. अर्थ समजत नसल्याने तिथे उगीचच गोंगाट वाटला. पण काही समजून घ्यावे यथावकाश हे मात्र नक्की ठरवले. त्यातल्या त्यात ज्या भाषा देवनागरी आणि इंग्रजीलिपीत आहेत त्याची अक्षरे वा शब्द वाचता तरी येत होते. काहीवेळा अर्थ कळायचा. काही वेळा केवळ उच्चार करता यायचा. प्रत्येक नगरातील शब्दांचा साज निराळाच.
 
शब्दांचं हे गाव मला अधिकच भावलं जेव्हा मी माराठीच्या नगरात म्हणजेच वसाहतीत पाऊल ठेवलं. आईची माया देणारी मायमराठी. मायमराठीचं नगर सजवलं होतं निरनिराळ्या वाड्‍मय प्रकारांनी. मढवले होते शब्दांना विविध अलंकारांनी. शब्द फेर धरून नाचत होते जिकडेतिकडे. तिथले शब्द रुणझुणणारे, किलबिलणारे अन्‌ ललकारणारे. शब्दांच्या त्या रम्य परिसरात मन अगदी तृप्त होत होतं. शब्दांचा पदन्यास पाहून तर हरखून गेले मी. शब्दांची झळाळी पाहून डोळेच मिटले मी. शब्दांचं वैभव पाहून तर हरपून गेले मी. काही शब्द एका भाषेतून दुसर भाषेत पाहुणे म्हणून जात होते, येत होते. तर काही तसेच रमत होते.
 
शब्दांची इतकी गर्दी पाहून खरंतर आनंदासोबतच मी गांगरले जास्त. सगळ शब्दांच सान्निध्यात असल्याने मन सुखावलेलं होतं. तरीही गोंधळून गेले होते.
 
मोत्यांच्या राशीतून एकेक मोती उचलून त्याची सुंदर माळ ओवावी तसंच वाटलं की, शब्दांचं हे भांडार समोर आहे तर ओवावा एकेक शब्द आणि रेखावा मनातला देखावा. शब्द हातात येत होते पण ओवले जात नव्हते. खूप प्रयत्न चालला होता माझा. पण व्यर्थ. काय करावे काही सुचेनासे झाले. खूप विचार केला की, इतके सुंदर शब्द इतक्या नजाकतीने ओवले तरी ओवले न जाता असे विखुरताहेत का बरे? विचार करता करता लक्षात आलं की, शब्दांना ओवायला भावनेचा धागा हवा तरच ते ओवले जाणार. एकेकांना जोडले जाणार आणि इप्सित साकारणार.
 
शब्दांच्या कोंदणात भावना का भावनेच्या धाग्यात शब्द या अगम्य विचारात असताना चालता चालता शब्दांचा गाव कधी मागे पडला ते कळलंच नाही.

मंजिरी सरदेशुख