शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

पित्तनाशक जांभूळ

अवीट गोडी असणारं हे फळ खाण्यातली मजा काही न्यारीच आहे. त्याचवेळी आरोग्यासाठीही हे फळ अतिशय उपयुक्त आहे. जांभळामुळे पित्त कमी होते. थकवा दूर होतो. शिवाय तहानही भागते. जांभळाच्या झाडाची पाने आणि सालही विविध रोगांवर उपयोगी आहे.

तापामुळे पचन नीट होत नसेल तर २-३ चमचे जांभळाच्या पानांचा रस घ्यावा. त्यामुळे पोटाला आराम मिळतो.

पित्तामुळे उलटी होत असल्यास जांभळाची दोन ते तीन हिरवी पाने पाण्यात उकळून व गाळून घ्यावीत. त्यानंतर मधासोबत घेतल्यास पित्तशमन होते.

शरीराला जखम झाल्यास वा खरचटल्यास जांभळाची पाने लावावीत. त्यामुळे रक्त थांबते.

दातातून रक्त येत असल्यास जांभळाची सालं बारीक करून त्यांचे मंजन करावे आणि दातांना लावावे. त्यामुळे दात दुखीला उतारा मिळतो.

हाता-पायांची जळजळ होत असल्यास पिकलेल्या जांभलाचा रस लावावा. नक्की फरक पडतो.

पिकलेल्या जांभळाला सेंधव लावून त्याला तीन ते चार तास ठेवावे. त्यानंतर ते मळून घ्यावे. मग कपड्यात बांधून टांगून ठेवावे. यातून निघणार्‍या रसाचे वीस ते तीस थेंब एक चमचा पाण्यात मिसळून घेतल्यास हगवण थांबते. शिवाय भूक लागते. यात मीठ थोडे जास्त घातल्यास बराच काळ टिकते. त्याला थोड्या काळानंतर उन दाखवावे. म्हणजे ते खराब होत नाही.

सूचना- अर्धेकच्चे जांभूळ खाऊ नये. शिवाय ज्यांना गॅसेसचा त्रास असेल त्यांनी जांभूळ न खाणे योग्य.