शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

वंध्यत्व टाळण्यासाठी चांगली न्याहारी आवश्यक

रात्रभर पोट रिकामे असल्याने सकाळी उठल्या उठल्या व्यक्तीला भूक लागते. त्यामुळे पोटभर न्याहारी करणे आवश्यक ठरते. विशेषत: महिलांना सकाळी चांगली न्याहारी करणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी योग्य न्याहारी न केल्यास त्याचा परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतो. संध्याकाळपेक्षा सकाळी चांगले उष्मांक देणारे पदार्थ घेणे आवश्यक असते. त्यामुळे गर्भधारणेबाबत उद्भवणार्‍या अडचणी टाळता येतात.

जेरूसलेम येथील हिब्रू विद्यापीठ आणि तेल अवीव विद्यापीठातील संशोधकांनी न्याहारी आणि गर्भधारणा या विषयावर व्यापक संशोधन केले. रोज चांगली न्याहारी करणार्‍या गर्भवतींची प्रकृती चांगली राहते. महिलांच्या आरोग्यावर भोजनाचा काय परिणाम होतो याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.

पॉलिसिस्टिक ओहरी सिंड्रोम (पीसीओएस) या विकाराने आजारी असलेल्या व्यक्तींच्या इन्सुलिन निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात. त्याचा परिणाम डोक्यावरचे केस गळण्यावर होतो तर शरीरावर अनावश्यक केसांचे प्रमाण वाढते. वॉल्फसन मेडिकल सेंटरमध्ये 25 ते 39 वोगटांतील 60 महिलांवर 12 आठवडे प्रयोग करण्यात आले. या महिलांना ‘पीसीओएस’चा त्रास होत होता. त्यांचे वजन कमी झाले. या महिलांचे दोन गट पाडण्यात आले. यातील एका गटाला 1800 उष्मकाचे अन्न देण्यात येत होते तर दुसर्‍या गटाला 980 उष्मांक दिले जात होते. यात न्याहारी व जेवणाचा समावेश होता. ज्या महिलांची चांगली न्याहारी केली होती त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. ग्लुकोजची पातळी व इन्सुलिनचा अडथळ्याचे प्रमाण 8 टक्क्याने कमी झाले होते. तर दुसर्‍या गटावर कोणताही परिणाम झालेला नव्हता. हे संशोधन क्लिनिकल सायन्सच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.