शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जुलै 2014 (16:58 IST)

पेसमेकर्सविषयी काही महत्वाच्या गोष्टी

पेसमेकर हे एक लहान आकाराचे आणि साधारणपणे २५ ते ३५ ग्रॅम वजनाचे उपकरण आहे.  हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ज्या रूग्णांमध्ये हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते त्यांच्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.  अशा रूग्णांच्या हृदयातील स्नायूंकडे इलेक्ट्रिकल इम्पल्स पाठवून त्यायोगे हृदयाचे ठोके कृत्रिम पडावेत अशी व्यवस्था या उपकरणाच्या मदतीने केली जाते. साधारणपणे कोणत्याही निरोगी व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण दर मिनिटास ६० ते १०० इतके असते. मात्र हेच प्रमाण मिनिटास ४० पेक्षाही कमी इतके मंदावले तर अशा व्यक्तीस चक्कर येणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे किंवा काही वेळ शुद्ध हरपणे यासारख्या घटनाही घडु शकतात. अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्यास त्या रूग्णास पेसमेकर बसवुन घेणे आवश्यक असण्याचे एशियन हार्ट इंस्टीट्यूटचे सिनीअर  कार्डियोलॉजिस्ट  डॉ. संतोष कुमार डोरा यांनी सांगितले आहे.  
 
हृदयातील स्नायुंची क्षमता वाढविण्याबरोबरच हृदयातील ठोके सामान्य आहेत की नाहीत हे ओळखण्याची क्षमतादेखील पेसमेकर या उपकरणामध्ये असते. साहजिकच जर हृदयाची गती सामान्य असेल तर पेसमेकर कृत्रिमरित्या स्नायुंना प्रेरित करून हृदयाचे ठोके वाढविण्याचा प्रयत्न करीत नाही.  वेगळ्या शब्दात सांगायचे तर, मागणीनुसार कार्य करणारे म्हणजे डिमांड पेसिंग या प्रकारचे हे उपकरण आहे.  या वैशिष्ट्यामुळे पेसमेकरमधील बॅटरीच्या उर्जेची बचत होते आणि या उपकरणाचे आयुष्यमानदेखील वाढत असल्याचे डॉ. डोरा यांनी सांगितले. 
 
गळ्याजवळच्या डाव्या किंवा उजव्या हाडाच्या खालील बाजुस त्वचा आणि चरबीच्या खाली पेसमेकर बसविण्यात येतो. एका रक्तवाहिनीच्या मदतीने या उपकरणातील प्रेरक घटक प्रवाहित केले जातात आणि या रक्तवाहिनीच्या एका बाजूस हृदयाचे स्नायु आणि दुसऱ्या बाजुस पेसमेकर अशा पद्धतीने हे उपकऱण बसविले जाते.  पेसमेकरमधील मापदंड (पॅरामीटर्स) आवश्यकतेनुसार बदलण्यासारखे असतात आणि बाहेरूनदेखील त्यांमध्ये बदल करता येऊ शकतात. सर्वसाधारणपणे पेसमेकर या उपकरणाचे आयुर्मान १० ते १२ वर्षे इतके असते.  संबंधित रूग्णाच्या हृदयाची गती सामान्य ठेवण्यासाठी पेसमेकरकडून किती प्रमाणात प्रवाहाचा उपयोग केला गेला त्यावर या उपकरणाचे एकूण आयुर्मान ठरते. 
 
ज्या रूग्णांमध्ये पेसमेकर बसविलेला आहे अशा रूग्णांना शक्यतो त्यांच्या दैनंदिनीमध्ये फारसे काही बदल करावे लागत नाहीत. मात्र, तरीही काही गोष्टींबाबतची माहिती या रूग्णांना असणे आवश्यक आहेः-
 
1. सेलफोन वापरताना विरूद्ध बाजुच्या कानाचा वापर करावा. म्हणजेच असे की, जर पेसमेकर गळ्याखालील डावीकडच्या हाडाजवळ बसविलेला असेल तर सेलफोनवर बोलताना उजव्या कानावर फोन ठेवून बोलावे. 
 
2. उच्च क्षमतेच्या विद्युततारांजवळ जाऊ नये. पेसमेकर बसविलेले रूग्ण घरगुती वापराच्या सर्व इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर कोणत्याही अडचणीशिवाय करू शकतात. मात्र, अशी उपकरणे योग्य पद्धतीने स्थापित केलेली असावीत. इलेक्ट्रिक उपकरणाची कळ चालु किंवा बंद करणे, टीव्ही पाहणे, संगणकावर काम करणे, मायक्रोवेव्ह हाताळणे यासारखी कामे करण्यास काहीच हरकत नसते. 
 
3. मेटल डिटेक्टरजवळुन जाताना अशा रूग्णांनी जलदगतीने जावे आणि संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यास आपल्या शरीरातील या उपकरणाविषयी माहिती द्यावी. त्यामुळे सदर सुरक्षा कर्मचारी मेटल डिटेक्टरच्या ऐवजी हाताने सदर व्यक्तीची तपासणी करेल. 
 
4. पेसमेकर बसविलेल्या रूग्णांनी मॉल्स किंवा अन्य ठिकाणी बसविण्यात आलेले मेटल डिटेक्टर्स किंवा थेफ्ट डिटेक्टर्सच्या अधिक जवळ जाऊ नये. 
 
5. अल्ट्रा साऊंड, एकोकार्डिओग्रॅम, एक्स-रे, सीटी स्कॅन यासारखी विविध वैद्यकीय परिक्षणे या रूग्णांमध्ये सहजपणे, कोणत्याही समस्येशिवाय करता येऊ शकतात. मात्र मॅग्नेटिक रिसोनन्स इमेजिंग (एमआरआय) ही चाचणी अशा रूग्णांवर करू नये, कारण त्यामुळे पेसमेकर सर्किटचे नुकसान होऊ शकते. अलिकडेच एमआरआयकरिता अनुकुल ठरेल असा पेसमेकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे असा पेसमेकर बसविल्यास रूग्णाला एमआरआयदेखील सुरक्षितपणे करून घेता येईल. 
 
6. रेडिएशन थेरपी ही उपचार पद्धती अनेकदा कर्करोगाने आजारी असलेल्या रूग्णांसाठी आवश्यक ठरते. मात्र असे उपचार करताना पेसमेकर थेटपणे रेडिएशनच्या मार्गात आल्यास त्यामुळे पेसमेकरचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे रेडिएशनच्या किरणांचा थेट परिणाम पेसमेकर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.