शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 एप्रिल 2014 (16:54 IST)

सर्दी : एक घातक विकार

अधून- मधून होणा-या सर्दीला वैद्यकीय शास्त्रात ‘कॉमन कोल्ड’ असे म्हटले जाते. सर्दी झाली की घसा खवखवायला लागतो, नाक वाहायला लागते, शिंका येतात, काही वेळा डोळ्यांतून पाणीसुद्धा येते. सर्दी सर्वांनाच होते; परंतु लहान मुलांना ती जास्त प्रमाणात होते. जसजसे वय वाढत जाते तसतसे सर्दीचे प्रमाण कमी होते; परंतु निरोगी प्रौढांच्या आरोग्यावर सर्दीचा घातक परिणाम होऊ शकतो. सर्दी ही संसर्गजन्य असते. ती नेमकी कशाने होते हे १०० टक्के नेमकेपणाने सांगता येत नाही; परंतु सर्दी होण्यास दोनशे प्रकारचे व्हायरस कारणीभूत ठरू शकतात. त्यातील बहुतेक व्हायरसपासून होणारी सर्दी ही फार घातक नसते आणि कसलीही गुंतागुंत न होता आपोआप दुरुस्त होऊन जाते. सर्दीची काही लक्षणे आणि फ्ल्यूची लक्षणे जवळपास सारखी असतात.अंग दुखणे, बारीक ताप येणे इत्यादी लक्षणांमुळे नेमका फ्ल्यू झाला आहे की सर्दी याबाबत संभ्रम निर्माण होतो. तेव्हा अशी लक्षणे दिसताच नेमकी तपासणी करून घेतली पाहिजे. ‘कॉमन कोल्ड’ किंवा सर्दी या आजारावर कसलेही औषध नाही. सर्दी झाल्यानंतर ती एखाद्या औषधाने दुरुस्त झाली आहे असे होत नाही. तरी लोक औषधे घेतात. त्या औषधांमुळे सर्दीच्या काही लक्षणांवर इलाज होतो. उदा. डोकेदुखी थांबते, ताप कमी होतो; पण हा इलाज मूळ सर्दीवरचा नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. 

सर्दी साधारणत: ७२ तासांनी किंवा काही प्रकारात आणखी २४ तासांनी आपोआप दुरुस्त होऊन जाते; परंतु जाता जाता ती आपल्या शरीरातल्या काही संस्थांवर परिणाम करून जाते. म्हणून प्रत्यक्षात सर्दीमध्ये फार त्रास होत नसला तरी वारंवार होणा-या सर्दीमुळे विविध संस्थांवर होणा-या परिणामाने नंतर त्याला त्रास होऊ शकतो. म्हणून सर्दी होण्याची वाट पाहण्यापेक्षा तिला प्रतिबंध केला पाहिजे. प्रतिबंध करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे विश्रांती घेणे. सर्दी झाल्यानंतर शरीराला विश्रांती आवश्यक असते म्हणून ती घेतली पाहिजे. पण तिचे परिणाम आपल्या शरीरावर होऊ नयेत म्हणूनही ती आवश्यक असते. त्याशिवाय सर्दी झाल्यानंतर आपण फार फिरायला लागलो, लोकांत मिसळायला लागलो तर लोकांना सर्दी होण्याची शक्यता असते. डॉक्टर मंडळी सध्या गरम पाण्याच्या वाफा घेणे हा सर्वांत सोपा उपाय सांगत असतात. सर्दी झाल्यास तो जरूर अवलंबावा.