खास महाराष्ट्रीय भाजी : अंबाडीची भाजी
साहित्य :- एक जुडी धुवून बारीक चिरलेली अंबाडी, अंबाडीची जुडी घेताना कोवळी बघून घ्यावी, जून भाजी चरबट लागते. पाच - सहा हिरव्या मिरचीचे तुकडे, गुळ २ पोफळाएवढा, मीठ चवीप्रमाणे, तिखट अर्धा चमचा, एक डावभर बेसन पीठ, शिजलेला भात चुरडून एकजीव केलेला १ वाटी, पंधरा - वीस लसूण पाकळ्या सोललेल्या, निम्मेनिम्मे तुकडे केलेली मोहरी, एक डाव तेल.
फोडणीचे साहित्य :- हरभरा डाळ एक डाव, दाणे १ डाव लहान.
कृती :- प्रथम डाळ, दाणे भिजत टाकून कुकरला चिरलेली भाजी, डाळ, दाणे गाळून उकडून घ्यावी. पाणी थोडे काढावे. नंतर डाळीचे पीठ भात आणि भाजी चांगली घाटून घ्यावी. १ डाव तेल घालून मोहरी, हिंग, हळद, लसूण घालून खमंग फोडणी करावी. लसूण तांबूस होऊ द्यावा. नंतर मीठ,मिरच्या, तिखट, गुळ घालून चांगली उकळी द्यावी. फार घट्ट नको मध्यम करावी. अंबाडीची भाजी आणि ज्वारीची गरम-गरम भाकरी खासा बेत आहे.