गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लग्नात खुर्चीवर बसून जेवणार्‍या दलित तरुणाचा बेदम मारहाण केल्याने मृत्यू

ही घटना उत्तराखंडच्या तेहरी गढवाल जिल्ह्यातील श्रीकोट परिसरातील आहे. उत्तराखंड पोलिसांनी एका 21 वर्षीय दलित तरुणाच्या कुटुंबाला कार्रवाईची हमी दिली आहे. 
 
उच्च वर्णीय लोकांनी 9 एप्रिल रोजी येथे लग्नाच्या पंगतीत खुर्चीत बसून जेवणाऱ्या दलित तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचे नाव जितेंद्र दास असे होते. त्यावर जबर मारहाण केल्यानंतर त्याला डेहराडून मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा काही दिवसानंतर मृत्यू झाला. 
 
माहितीनुसार मारहाण करणाऱ्या सात तरुणांच्या विरोधात दलित तरुणाच्या बहिणीने केलेल्या तक्रारीनुसार 29 एप्रिलला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र अद्याप यापैकी कोणालाही पोलसांनी अटक केलेली नाही.
 
श्रीकोट जवळ राहणारा जितेंद्र दास हा सुतारीचे काम करायचा. काही दिवसांपूर्वी एका दूरच्या नातलगाच्या लग्नात जितेंद्र आपल्या कुटुंबासोबत गेला होता. येथे जितेंद्रला खुर्चीवर बसून जेवत असताना पाहून तिथल्या उच्च जातीय तरुणांना राग आला व त्यांनी जेवणाच्या ताटासकट जितेंद्रला लाथ मारून खाली पाडले. दलित असूनही खुर्चीवर बसण्याची हिंमत कशी झाली असा प्रश्न करत या तरुणांनी जितेंद्रला माराहाण केली. इतकंच नव्हे तर घरी परत जात असताना देखील त्याच्यावर हल्ला केला. 
 
जखमी जितेंद्र घरी गेल्यावर कोणाला काही न सांगता झोपी गेला. दुसर्‍या दिवशी त्याच्या आईला प्रकरण कळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला इतका जबर मार लागला होता की तो त्याला घरी पोहचणे देखील कठिण होत होते असं त्याच्या सोबत असलेल्या भावाने सांगितले.
 
त्याच्या बहिणीनी आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली असली तरी अजून कुणालाही अटक केली गेली नाही. त्यांचे म्हणणे आहे की आरोपी अजून गावात स्वतंत्र फिरत आहे आणि तडजोड करण्यासाठी दबाव टाकत आहे.