मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 8 मार्च 2019 (09:42 IST)

संयुक्‍त राष्ट्राने फेटाळली हाफिझ सईदचे नाव दहशतवाद्यांच्या यादीतून वगळणारसाठी

बंदी घातलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून नाव वगळण्यासाठी जमात उद्‌ दावाचा म्होरक्‍या हाफिझ सईदने केलेली मागणी संयुक्‍त राष्ट्राने फेटाळली आहे. लष्कर ए तोयबाचा संस्थापक आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या हाफिझ सईदने बंदी हटवण्यासाठी संयुक्‍त राष्ट्राकडे अपील केले होते. भारताने त्याच्या कारवायांबाबतचे अतिशय गोपनीय माहितीचे पुरावे संयुक्‍त राष्ट्राकडे सादर केल्यामुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली आहे.
 
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने हाफिझ सईदवर 10 डिसेंबर 2008 रोजी बंदी घतली होती. पाकिस्तानात स्थानबद्ध असताना सईदने लाहोरमधील वकिलांच्या माध्यमातून या निर्णयाविरोधात 2017 मध्ये अपील केले होते. त्याच्या या अपिलाला भारताबरोबर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनेही विरोध केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या अपीलाला विरोध करण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात पाकिस्तानकडून विरोध झाला नाही. हाफिझच्या अपीलाची तपासणी करण्यसाठी संयुक्‍त राष्ट्राकडून डॅनिएल किप्फर या स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्‍ती केली गेली होती. त्यांनीच हाफिझ सईदचे अपील फेटाळण्यात आल्याचे त्याच्या वकिलांना कळवले.
 
पुलवामा येथे सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद संघटनेने केलेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्‍वभुमीवर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सच्यावतीने संयुक्‍त राष्ट्राच्या 1267 निर्बंध कमिटीपुढे जैशवरील बंदीचा प्रस्ताव सादर झाला असतानाच हा निर्णय झाला आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतली होती.