बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'हे' पुस्तक म्हणजे ढोंगी आणि चमचेगिरीचा उत्तम नमुना

ज्या लोकांनी पंतप्रधान मोदींना शिवाजी म्हणून संबोधले आहे, त्यांनीच लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना विष्णुचे तेरावे अवतार म्हटले होते. अशा लोकांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान आहे. यात पंतप्रधान मोदींची कोंडी होत आहे. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक म्हणजे ढोंगी आणि चमचेगिरीचा उत्तम नमुना असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. 
 
आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. श्री. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात 'नाही…नाही!' असेच आहे. त्यांची तुलना जे शिवाजी महाराजांशी करतात त्यांना छत्रपती शिवाजीराजे समजलेच नाहीत, असं सामनानं अग्रलेखात म्हटलं आहे.