बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

इंदापूर तालुक्याचे वाळवंट होण्याची शक्यता, नेमके काय आहे हे प्रकरण ?

जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणीवाटपाबाबत अन्यायकारक आहे. यामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्याचे वाळवंट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील तीनही साखर कारखान्यांवर संकट ओढवणार आहे. धोरणबदलाबाबत त्वरित दखल घ्यावयाची गरज असून मोठे जनआंदोलन व न्यायालयीन लढा उभा करावा लागणार आहे, अशी माहिती माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिली. 
 
इंदापूर तालुका शेतीच्या पाणीवाटपाबाबत कायमच टेलचा (शेवटचा) तालुका म्हणून ओळखला जातो. भाटघर धरणाच्या निर्मिती वेळेस नीरा डावा कालवा फाटा क्रमांक ४६ ते फाटा क्रमांक ५९ या उपकालव्याद्वारे तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.  आघाडी सरकारच्या काळात सिंचनाच्या क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झाल्याचे लक्षात आल्याने खडकवासला, नीरा-देवघर अशा दोन्ही धरणातून सणसर कटद्वारे इंदापूर तालुक्यातील सुमारे ७५ ते ७८ टक्के क्षेत्र ओलिताखाली आणले होते. बारामती तालुक्यातील फक्त साधारण ३५ टक्के ओलिताखाली आले होते.   
 
जलसंपदा खात्याच्या नवीन निर्णयामुळे नीरा-देवघर धरणातून मिळणारे पाच टीएमसी पाणी त्याप्रमाणे सणसर कट मधून मिळणारे बहुतांश पाणी आता मिळणार नाही. तसेच शेटफळ तलावासाठी मिळणारे दोन टिएमसी पाणीही मिळणार नाही. उन्हाळी हंगामात किमान दोन आवर्तनाची गरज असते त्याद्वारे चाऱ्याचे उत्पादन, उन्हाळी हंगामातील पिके यांना पाणी मिळते. पण उन्हाळी हंगामात फक्त एक वेळेला आणि तेही पाणी असेल तर आवर्तन देण्यात येणार आहे . शेती उत्पादनावर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.