गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही नराधमांना फाशी

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी नुकताच हा निकाल दिला आहे. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ अशी फाशी ठोठावलेल्या नराधमांची नावे आहेत. सकाळी 11:30 सुमारास निकालच्या वाचनाला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या पाचच मिनिटात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
 
यावेळी निकालाच्या प्रतीक्षेत न्यायालय कक्षात गर्दी, पीडितेची आई, बहीण आणि कोपर्डीचे नागरिक पहिल्या रांगेत तिन्ही दोषी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर होते. न्यायालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज दोषींना शिक्षा सुनावली जाणार असल्याने फाशी की जन्मठेप याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. 13 जुलै 2016 ला नगर येथील कोपर्डीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना 18 नोव्हेंबर 2017 ला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. कोपर्डीच्या या नराधमांना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फाशीची मागणी केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात दोषी संतोष भवाळाच्या वकिलांनी आणि निकम यांनी गेल्या आठवड्यात युक्तिवाद पूर्ण केला.