सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 6 मार्च 2018 (11:05 IST)

1 लाख शेतकरी आज विधानभवनावर धडकणार

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने निर्णायक लढा द्यायचे ठरवले असून सभेने आज (मंगळवारी) नाशिक ते मुंबई अशा लाँगमार्चचे आयोजन केले आहे. विधानसभा अधिवेशन काळात आयोजित करण्यात आलेल्या या लाँगमार्चमध्ये राज्यभरातून सुमारे एक लाख शेतकरी सहभागी होतील असा दावा किसान सभेने केला आहे.
 
नाशिक येथून मुंबईपर्यंत पायी चालत येणारे हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरूच राहील, असे किसान सभेने जाहीर केले आहे.
 
सरकारी धोरणे आणिनैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. ते खचून जाऊन आत्महत्या करत आहेत.  
 
शेतकर्‍यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार मात्र शेतकर्‍यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा करत आहे. म्हणूनच शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल 1753 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, तसे म्हणत किसान सभेने शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आरपार लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
किसान सभेने मार्च 2016 मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकर्‍यांचा महामुक्काम सत्याग्रह केला होता. महामुक्कामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र सरकारने घोषणा करूनही या मागण्या पूर्ण केल्याच नाहीत. उलट शेतकर्‍यांची वारंवार फसवणूक केली असल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे. 
 
अशा आहेत शेतकर्‍यांच्या मागण्या
* कसत असलेल्या वनजमिनी शेतकर्‍यांच्या नावे करा
* कष्टकरी शेतकर्‍यांना विनाअट संपूर्ण कर्जुक्ती द्या 
* शेतीमालाला दीडपट भावाची हमी  द्या  
* स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंलबजावणी करा
* वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंलबजावणी करा
* बोंडअळी आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एकरी किमान 40 हजार रुपये भरपाई द्या  
* शेतकर्‍यांचे वीज बिल माफ  
* दुधाला 40 रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा