नाशिक: १४ शाळांलगतच अमली पदार्थ विक्रीचा संशय; ३५ पानटपऱ्या कायमच्या काढल्या
शहरात मुंबई पोलिसांनी एमडी कारखाना उद्ध्वस्त केला. त्यानंतर आता नाशिक पोलिसही खडबडून जागे होत त्यांनी महापालिकेच्या सहकार्याने शहरामधील अनधिकृत तसेच गैरकृत्यांशी संबंधित कॅफेंवर कारवाई केलीच, त्याचपाठोपाठ गुरुवारी (दि. १९) पालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार व पोलिस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली १४ शाळा, महाविद्यालयांना लागून असलेल्या अनधिकृत व अमली पदार्थ विक्रीचा संशय असलेल्या ३५ पानटपऱ्या जप्त केल्या. तसेच या पानटपऱ्या पुन्हा सुरू होऊ नये म्हणून नोटीसही बजावण्यात आली आहे.
हे ही वाचा: नाशिक: रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत नाशिकच्या तरुणाला सात लाख रुपयांचा गंडा
शाळांपासून १०० मीटर परिसरात कुठलेही अमली पदार्थ विक्री करण्यास बंदी असल्याचा नियम दाखवत विद्यार्थी अमली पदार्थाच्या आहरी जात असल्याचे तक्रारी संस्थाचालक, शिक्षक व पालकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. याची दखल घेत पालिका व पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई करत शाळांच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटवल्या.
या शाळांच्या परिसरात कारवाई:
रचना विद्यालय शरणपूररोड, रुंग्टा हायस्कूल अशोकस्तंभ, अशोका इंटरनॅशनल स्कूल अशोका मार्ग, रेहनुमा स्कूल पखाल रोड, बी.वाय.के. कॉलेज, भोंसला स्कूल, आर.वाय.के. कॉलेज, के. के. वाघ कॉलेज, श्रीराम विद्यालय, मनपा अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळा, सारडा कन्या विद्यालय, डी. डी. बिटको, आदर्श मॉन्टेसरी बाल विद्यामंदिर , आदर्श माध्यमिक विद्यालय या शाळांच्या परिसरात अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
..तर फौजदारी गुन्हा:
मनपा व पोलिस प्रशासनाने पान टपऱ्या जप्त करत संबधीत टपरी चालकाला नोटीस बजावत कारवाई केली. पोलिस प्रशासनाने संबधित टपरी चालकांना पुन्हा टपरी लावण्याचा प्रयत्न केला तर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला.