सानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. ही माहिती स्वत: सानियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका फोटोच्या माध्यमातून शेअर केली.
सानियाने फोटोत मुलगा किंवा मुलगी यांचे कपडे दर्शवत कॅप्शनमध्ये #BabyMirzaMalik हा हॅशटॅग वापरला. या फोटोत एका बाजूला मिर्झा, तर दुसऱ्या बाजूला मलिक लिहिलेलं दिसतं आहे. या दोघांच्या मध्ये मिर्जा-मलिक लिहिण्यात आलं आहे.
सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या लग्नाला 12 एप्रिल रोजी 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे सानिया ऑक्टोबर 2017 पासून टेनिस खेळलेली नाही.
सानिया मिर्झानं एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोवा फेस्ट-2018 मध्ये सहभाग घेतला होता. स्त्री-पुरुष भेदभाव या विषयावर या फेस्टमध्ये चर्चा झाली होती. यावेळी बोलताना सानियानं होणाऱ्या अपत्याचा उल्लेख केला होता. 'मी आणि माझे पती याविषयी बोललो आहोत. जेव्हा आम्हाला मूल होईल, तेव्हा त्याचं आडनाव मिर्झा-मलिक असेल, असं आम्ही ठरवलंय,' असं सानियानं म्हटलं होतं.