सीबीआयने लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ केला सादर
भारतीय बँकांना हजारो कोटीचा चुना लावून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने मुंबईतील आर्थर रोड कारागृहात योग्य सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता सीबीआयने लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला आहे. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे.
सदरच्या व्हिडीओमध्ये आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक 12 मध्ये सुर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे. यासोबतच व्हिडीओत बराकमध्ये पूर्व दिशेला खिडकी असून तेथून सुर्यप्रकाश आणि हवा येण्यासाठी जागा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. याशिवाय मल्ल्याला इतर कैद्यांप्रमाणे ग्रंथालय वापरण्याची सुविधा दिली जाईल असंही न्यायालयात सांगण्यात आलं आहे.