testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

द्रष्टा 'योद्धा संन्यासी'

वेबदुनिया|
भारत आज जगाचा मुकूटमणी बनला आहे. भारतीय बुद्धिमत्ता जगावर अधिराज्य गाजवते आहे. भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मिकता यांचा मोह जगभरातील लोकांना पडला आहे. भारतीय उद्योगांनी जग पादाक्रांत करायची मोहीम सुरू केली आहे. सॉफ्टवेअरपासून व्यापारापर्यंत आणि खेळापासून अध्यात्मिकतेपर्यंत भारतीयांचे जगावरील प्रभूत्व आता सगळ्यांच्याच नजरेस येऊ लागले आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या स्वामी विवेकानंदांना तरी वेगळे काय अपेक्षित होते. त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी पाळल्या म्हणूनच तर भारतीय ही घोडदौड करू शकले. त्यांनी त्या काळात मांडलेली मते किती उपयुक्त होती, हे आजच्या यशाच्या कसोटीवरही सहज घासून बघता येईल. त्यासाठीच शिकागो येथील सर्वधर्म परिषदेहून परतल्यानंतर मद्रास येथे त्यांनी दिलेल्या भाषणातील हा संपादीत अंश वाचा.....
व्यापक बनणे, संकुचित क्षेत्रातून बाहेर पडणे, सर्वांशी मिसळणे, हळूहळू विश्वाशी एकरूप होणे ही आपली अंतिम ध्येये आहेत. आणि आपण मात्र सदासर्वदा आपल्या शास्त्रांतील उपदेशांच्या विरूध्द वागून अधिकाधिक संकुचित बनत आहोत आणि स्वत:ला इतरांपासून वेगळे करीत आहोत.

आपल्या मार्गात कितीतरी धोके आहेत. आणि त्यापैकी एक म्हणजे, या जगात केवळ आपणच श्रेष्ठ आहोत ही अभिनिवेशपूर्ण कल्पना होय. भारताबद्दल अतिशय प्रीती, देशभक्ती व आपल्या पूर्वजांविषयी आदर बाळगूनही मला वाटत आहे की आपल्याला इतर देशांकडून पुष्कळ गोष्टी शिकावयाच्या आहेत. ज्ञानप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या पायाशी बसण्याची आपली तयारी असली पाहिजे, कारण प्रत्येकजण आपल्याला उच्च प्रकारचे ज्ञान देऊ शकतो हे लक्षात ठेवा. थोर स्मृतिकार मनू म्हणतात, ''खालच्या जातीतील व्यक्तीपासूनही चांगले असेल ते घ्या व अंत्यजाची देखिल सेवा करून त्याच्यापासून स्वर्गप्राप्ती करून देणारी विद्या शिका.'' अतएव मनूंचे खरे वंशज म्हणून आपण त्यांचा आदेश प्रमाण मानला पाहिजे व ऐहिक किंवा पारमार्थिक जीवनासंबंधीची शिकवण जो कोणी सुयोग्य असेल त्याच्याकडून प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला हेही विसरून चालावयाचे नाही की जगाला देण्यासारखे थोर ज्ञान आपल्याजवळसुध्दा आहे.

भारताबाहेरील जगाविना आपले चालणार नाही, आपले असे चालू शकेल हा विचार मूर्खपणाचा होता व त्याचे प्रायश्चित्त एक हजार वर्षांच्या गुलामगिरीच्या रूपात आपल्याला भोगावे लागले आहे. आपण आपल्या देशाबाहेर गेलो नाही, आपल्या देशातील परिस्थिती व अन्य देशांतील परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास केला नाही, आणि आपल्या भोवती काय चालले आहे त्याकडे लक्ष दिले नाही. हेच भारतीय मनाच्या अधोगतीचे एक मोठे कारण आहे. आपण त्याबद्दल भरपूर प्रायश्चित्त भोगले आहे. यापुढे आपण पुन्हा असे करण्याचे टाळू या. भारतीयांनी भारताबाहेर जाऊ नये अशा प्रकारच्या सर्व कल्पना बालिश आहेत, मूर्खपणाच्या आहेत. त्या मुळापासूनच नाहीशा केल्या पाहिजेत. भारताबाहेरिल निरनिराळ्या देशांत तुम्ही जितका अधिक प्रवास कराल, तितके ते तुम्हाला व तुमच्या देशाला हितावह आहे. गेली शेकडो वर्षे जर आपण असे केले असते तर आज भारतावर राज्य करू पाहणार्‍या कोणत्याही देशाच्या पायांवर बसण्याचा प्रसंग आपल्यावर आला नसता.

जीवनाचे पहिले दृश्य चिन्ह म्हणजे विस्तार पावणे हे होय. तुम्हाला जगावयाचे असेल तर तुम्ही विस्तार पावलेच पाहिजे. ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा. मी इंग्लंड-अमेरीकेला गेलो या गोष्टीचा तुम्ही आत्ताच उल्लेख केला. मला जाणेच भाग होते. कारण देशाच्या पुनरूत्थानाचे पहिले लक्षण विस्तार पावणे हे होय. या राष्ट्रजीवनाचे पुनरूत्थान होत असता आतल्या आत त्याचा विस्तार झाल्यामुळे मी जणू देशाबाहेर फेकला गेलो आणि अशाप्रकारे हजारोजण बाहेर फेकले जातील. आपल्या राष्ट्राला जिवंत रहावयाचे असेल तर हे घडून आहेच पाहिजे, हे माझे शब्द ध्यानात ठेवा. म्हणून राष्ट्राच्या पुनरूत्थानाचे हे सर्वात मोठे चिन्ह आहे, आणि या विस्तार पावण्यातूनच एकंदर मानवी ज्ञानसंपदेत आपल्याला घालावयाची भर व जगाच्या उन्नतीसाठी आपल्याला द्यावयाचे सहकार्य ही दोन्ही जगाला प्राप्त होत आहेत. आणि ही काही नविन गोष्ट नाही.


यावर अधिक वाचा :