बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

ह्या 'ज्यूस'चे सेवन करा आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवा

हा ज्यूस म्हणजे बीटचा ज्यूस होय. बीट तुम्हाला माहितीच असेल, परंतु काहीजण हे आवडत नाही म्हणून खाण्याचे टाळतात. मात्र याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठी चांगले असणारे हे बीट आता मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाही मदत करत असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
 
बीटचा ज्यूस पिण्याने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत असून, वृद्धांचा मेंदू तरुणांप्रमाणे कार्यक्षम राहण्यास मदत होते.
 
अमेरिकेच्या वेक फॉरेस्ट विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. यामध्ये 55 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या 22 पुरुष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्यांना आठवडयातून तीन वेळा असे सहा महिने बीटचा रस पिण्यास दिला. रस पिण्यापूर्वी त्यांना 50 मिनिटे चालण्यास सांगितले होते.
 
सहभागी झालेल्या निम्म्या लोकांना बीटमधून 560 मिली ग्रॅम नायट्रेट मिळाले, तर इतरांना बीटमधून अतिशय कमी प्रमाणात नायट्रेट उपलब्ध झाले. ज्या वेळी तुम्ही व्यायाम करता, त्या वेळी तुमच्या मेंदूमधून सोमॅटोमोटर कॉर्टेक्‍स स्नायूतील माहिती प्रक्रिया सुरू करतो. व्यायाम करण्यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस मजबूत होण्यास मदत होते. व्यायाम करण्यामुळे आपल्या मेंदूतील ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होतो. त्या वेळी बीटचा रस घेतल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्‍सिजनचा पुरवठा होतो. यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस बळकट करण्यासाठी योग्य वातावरण मिळते. याचा थेट परिणाम मेंदूवर होत असून, तो अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होत असल्याचे अभ्यासात दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले.व्यायाम आणि बीट यामुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असून, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले.