शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

पाणी हे त्वचेसाठी सर्वत चांगले औषध

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून दहा ते बारा ग्लास पाणी प्यायला हवे. हा पाण्याचा पुरवठा तुम्ही केला नाही तर शरीराला लागणारे पाणी त्वचेतून खेचले जाते. त्वचा कोरडी पडते. ते टाळण्यासाठी दिवसभरातून खूप वेळा पाणी प्या. त्वचा कोरडी पडू नये म्हणून आणि त्वचेतल्या पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून त्वचेला मॉइश्‍चरायझर लावावे. त्यामुळे त्वचा सैल पडत नाही.
 
मॉइश्‍चरायझर लावायची सर्वात चांगली वेळ म्हणजे चेहरा धुतल्यावर किंवा अंघोळ केल्यानंतर लावावे. कारण त्यावेळेस त्वचा जास्त कार्यशील असते. साधे मॉईश्‍चरायझर लावल्यानंतर मॉईश्‍चरायझिंग फेस मास्क लावला तर त्वचेसाठी ते जास्त फायदेशीर असते. स्टीमबाथ घेण्यापूर्वी हे दोन्ही मॉइश्‍चरायझर लावले तर फेशियल सॉनाचे सुख तुम्हाला अनुभवता येईल. स्टीमबाथमुळे घाम खूप येतो.त्यामुळे त्वचेवर दाब पडतो. दाबामुळे त्वचा मऊ पडते, आणि तैलग्रंथीमधले जास्तीचे तेल बाहेर पडते व त्वचेची छिद्रे मोकळी होतात.
 
चेहरा साबणाने आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते. त्वचा मुलायम आणि ओलसर दिसण्यासाठी चेहऱ्याला लावलेला साबण पूर्णपणे धुवून काढणे अगदी आवश्‍यक आहे. काही तज्ज्ञांचे तर पाण्याचे कमीतकमी 30 वेळा हाबकारे मारायला हवे असे सांगतात. काही तज्ज्ञ 20 वेळा सांगतात. मूळ मुद्दा चेहऱ्यावरचा साबणाचा अंश राहू देऊ नये हा आहे.नाहीतर त्वचा कोरडी पडते.
 
चेहरा धुण्यासाठी कोणते पाणी वापरता त्यालाही महत्त्व आहे. बोअरच्या पाण्यात क्षार असतात. ते नको. पिण्याचे पाणी चांगले. त्याने चेहरा धुवावा. सहन होईल अशा गरम पाण्याचे हाबकारे मारावे आणि बोटांनी चेहऱ्याच्या त्वचेवर थापटल्यासारखे करावे. त्यामुळे त्वचेचा पोत आणि छटा सुधारते. विमानामध्ये हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे त्वचा थकल्यासारखी होते. मिनरल वॉटरने त्वचा धुतल्याने त्वचेला तजेला येतो. पाण्याचा स्प्रे मारा किंवा नॅपकीन पाण्यात भिजवून अधुनमधून चेहरा पुसत जा.