गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (14:34 IST)

असे 'बर्थ डे' सेलिब्रेशन घातक

वाढदिवशी केक कापण्याआधी त्यावरील ‘फायर कॅण्डल’ पेटवून आतषबाजी करण्याचा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र हा प्रकार आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा इशारा वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे.  ‘फायर कॅण्डल’मधून एखाद्या भुईनळय़ासारख्या ठिणग्या उसळत असताना त्याची रासायनिक भुकटी केकवर सांडत असते. पांढऱ्या-करडय़ा रंगाची ही भुकटी केकवर स्पष्टपणे दिसत नसली तरी, तिचे प्रमाण लक्षणीय असते. ही रासायनिक भुकटी केकसोबत पोटात गेल्यास तिच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंड व यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पूर्वी विशेषत: वाढदिवशी पेटती मेणबत्ती विझवून केक कापला जात असे. मात्र, शुभप्रसंगी अग्नी विझवण्याचा प्रकार अशुभ मानला जाऊ लागल्यानंतर आता ‘फायर कॅण्डल’ला पसंती मिळू लागली आहे. ही ‘बत्ती’ सुमारे दहा ते बारा सेकंद जळते. मात्र, ती पेटत असताना त्यावरील रासायनिक भुकटी खाली केकवर सांडते. असा केक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.