1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

मुंबई इंडियंसचा सरळ विजय

मुंबई इंडियंसचा सरळ विजय
WD
सचिन तेंडुलकर (51) व रायडू (51) यांच्या अर्धशतकानंतर हरभजन, मलिंगा व मुनाफच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 23 धावांनी विजय मिळविला. मुंबईच्या स्पर्धेतील आठ सामन्यातील सहावा विजय आहे.

गिलख्रिस्ट भज्जीच्या पहिल्याच षटकात पायचीत झाला. त्यामुळे धास्तावलेल्या पंजाबने सावध खेळणेच योग्य मानले. पॉल व मार्श यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी करीत संघाला सावरले. परंतु, सायमंड्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याचा मोह पॉलला (३३) आवरला नाही आणि तो पोलार्डकरवी झेलबाद झाला. हसी (२), कार्तिक (१) हे स्वस्तात परतले. मार्श (४७ चेंडूंत ६१) आणि अभिषेक नायर (१४) यांनी विजयासाठी संघर्ष केला. त्यानंतर तळाचे फलंदाज मात्र हजेरी लावूनच परतले.

तत्पूर्वी, १० चेंडूंत १० धावा करून डेव्हिड जेकब तंबूत परतल्यानंतर अंबाती रायडू (५१) आणि कर्णधार सचिन तेंडुलकर (५१) या जोडीने मैदानात विकेट तर टिकवून ठेवलीच, शिवाय लक्षवेधी फटकेबाजीही केली. त्यांच्या अर्धशतकांच्या बळावरच मुंबई इंडियन्सने मोठी धावसंख्या उभारली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी रचली. अंबाती रायडूने अवघ्या ३५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. ५१ धावांवर असताना चावलाच्या चेंडूला सीमापार करण्याच्या प्रयत्नात मारलेला फटका दिनेश कार्तिेकने टिपला आणि रायडूचा खेळ संपला. तो बाद होताच सचिनने फटकेबाजी सुरू केली. ४३ चेंडत त्याने अर्धशतक पूर्ण केले. हॅरिसच्या चेंडूवर सचिनचा फटका थेट नायरच्या हातात विसावला. त्यानंतर आलेल्या पोलार्डने केवळ ११ चेंडूंत २० धावा चोपल्या. यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने झटपट धावा करण्याचा सपाटा लावला. ११ चेंडूंत १८ धावा करीत त्याने संघाला १५९ धावसंख्येपर्यंत खेचले.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा