इग्नू सहामाही ब्रिज कोर्स
नापास विद्यार्थ्यांसाठी बीए, बीकॉम पदवी
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने (इग्नू) दहावी व बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आशेचा किरण दाखविला आहे. इग्नूच्या वतीने अशा विद्यार्थ्यांसाठी आता सहामाही ब्रिज कोर्स उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामाध्यमातून नापास झालेले विद्यार्थी बीए, बीकॉम या पदवीच्या परीक्षेस पात्र ठरू शकतात. आता दहावी व बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना हताश होण्याचे कारण नाही. इग्नूचा सहा महिन्याचा ब्रिज कोर्स करून पदवी परीक्षेस बसण्यास असे विद्यार्थी पात्र ठरत असतात. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडून नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध व्यवसाय अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले आहे. इग्नू क्षेत्रीय कार्यालय, भोपाळ येथील निर्देशक डॉ. के. एस. तिवारी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत इग्नूच्या नवीन पात्रता व व्यावसायिक कोर्स संदर्भात माहिती दिली. 10वी व 12वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थी कमालीचे हताश झालेले असतात. काही काळानंतर त्यांच्या मनात वैफल्य निर्माण होते. दु:खा भेदरलेले विद्यार्थी आत्महत्या करण्यात प्रवृत्त होतात. गेल्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या आत्महत्तेच्या घटनेत वाढ झाली आहे. अशा प्रकाराने विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नूने सहा महिन्याचा ब्रिज कोर्स पदवी पात्रता अभ्यासक्रम (बीपीपी) तयार करण्यात आला आहे, असे डॉ. तिवारी यांनी सांगितले. ब्रिज कोर्स पूर्णं केलेल्या विद्यार्थी बीए, बीकॉम, समाजकार्य व पर्यटन अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त करू शकतात. इग्नूच्या ब्रिज कोर्सला देशातील सगळ्या विद्यापीठाची मान्यता आहे. ब्रिज कोर्सला वयाची मर्यादा नाही, त्यामुळे कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी ब्रिज कोर्सला प्रवेश घेऊ शकतो.डॉ. तिवारी यांनी सांगितले की, गोवा, केरळ, महाराष्ट्र व मध्यप्रदेश हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. ब्रिज कोर्स झालेल्या विद्यार्थ्यांना पर्यटन अभ्यासक्रमाची पदवी घेऊन पर्यटनात करियर करण्याची सुवर्ण संधी आहे. मध्यप्रदेशातील मालवा-निमा़ड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भोपाळ येथील पर्यटन भवनात नुकतेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते इग्नूच्या तीन नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, फूड अॅण्ड ब्रेवरेज व हाउसकीपिंगचे सहा महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स पहिल्या टप्प्यातील 300 विद्यार्थ्यांना निःशुल्क शिकवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या राहणे व जेवणाची व्यवस्था राज्य शासनाच्या वतीने केली जाईल.