1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. धीरे धीरे से पाहून पूजा भट्‍टने मुरडलं नाक

धीरे धीरे से पाहून पूजा भट्‍टने मुरडलं नाक

आशिकी
सुप्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगने ‘आशिकी’ चित्रपटातील ‘धीरे धीरे से’ गाण्याला त्याच्या शैलीत सादर केलं आहे. हृतिक रोशन आणि सोनम कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला यूट्यूबवर एका आठवड्याचा आतच 1 कोटी 44 लाख हिट्स मिळाले. मात्र अभिनेत्री पूजा भट्टला गाण्याचा हा नवा अवतार काहीसा रुचला नाही. 
 
1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनू अगरवाल आणि राहुल रॉय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाने नुकतीच 25 वर्षे पूर्ण केली. सिल्व्हर ज्युबिलीच्या निमित्ताने त्यातल्या ‘धीरे-धीरे से मेरी जिंदगी में आना’ या रोमँटिक गाण्याचा रिमेक करण्यात आला. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हे गाणं हनी सिंगच्या आवाजत पुन्हा रिलीज करण्यात आलं. धीरे धीरेचा रिमेक बॉलीवूडमधील अनेकांच्या पसंतीस उतरला आहे, मात्र अभिनेत्री पूजा भट्टला हे गाणं विशेष आवडलं नाही. 
 
‘सध्याचा काळ हा नकलांचा आहे, मात्र ओरिजनल धीरे धीरेला कोणीच मागे टाकू शकत नाही’ असं पूजाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटसोबत तिने मूळ गाणंही शेअर केलं आहे. पूजा भट्टचे पिता, सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ‘आशिकी’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर काही वर्षापूर्वी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यावर चित्रित झालेला ‘आशिकी 2’ प्रदर्शित झाला होता.