भूतांवर माझा विश्वास आहेः अमृता
बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांत छोट्या मोठ्या भूमिकांत दिसत असलेली मराठमोळी अमृता खानविलकर आता रामगोपाल वर्मांच्या 'फूंक'मधून एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर झी मराठी या वाहिनीवर झालेल्या 'एकापेक्षा एक' या नृत्यावर आधारीत रियालिटी शोच्या सेलिब्रेटी भागात ती उपविजेती ठरली. या दोन्हीचे निमित्त साधून तिच्याशी मारलेल्या या गप्पा.....'
फूंक'च्या आधीही तू बॉलीवूडमध्ये काम केलंय ना? -
होय, रामगोपाल वर्मांच्याच कॉंट्रॅक्टमध्ये मला छोटी भूमिका मिळाली होती. त्याचबरोबर विक्रम भट यांच्या 'मुंबई सालसा' आणि आणखी एका 'हॅटट्रिक' या चित्रपटात मी काम केलंय. मग 'फूंक'मधली भूमिका कशी मिळाली? - '
कॉंट्रॅक्ट' करतानाच रामगोपाल वर्मांनी 'फूंक'साठी विचारणा केली होती. मी त्यांना लगेचच होकार दिला. कारण रामूंच्या चित्रपटात मिळत असलेली मोठी संधी गमावणे शक्यच नव्हते. रामगोपाल वर्मांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? -
खूपच छान अनुभव. त्यांच्याबरोबर काम करताना तू नवखी आहेस असं ते कधीही जाणवू देत नाही. मुळात ते असा भेदही करत नाही. कोणतंही 'प्रेशर' आणत नाहीत. त्यामुळे मोकळा अभिनय करायला मिळतो. शिवाय ते पुष्कळ 'सपोर्ट'ही करतात. त्यामुळे चित्रपट करताना मजा आली. '
फूंक'मधली भूमिका नेमकी काय आहे? -
यात मी एका मुलीच्या आईची म्हणजे आरतीची भूमिका करतेय. ही आई देवावर विश्वास ठेवणारी आहे. देवावर सगळं सोपवून मोकळी होणारी आहे. तिची मुलगी आजारी पडते. तिला भूत-प्रेत असे वेगवेगळे भास वगैरे व्हायला लागतात. आणि तिचा देवावरचा विश्वासही डळमळीत होतो. मग तिला वाटतं की जगात विज्ञानही कुठे तरी आहे. त्यालाही काही किंमत आहे. तुझा भूतांवर विश्वास आहे काय? -
माझा देवावर विश्वास आहे. चांगल्यावर विश्वास असल्यामुळे वाईटही या जगात आहे, असे वाटते. म्हणून भूत-प्रेतही या जगात असावेत असे मला वाटते. काळी जादू, जादूटोणा हेही प्रकार घडत असावेत असे मला वाटते. पण मी पूर्णपणे दैववादी आहे. रामगोपाल वर्मांच्या चित्रपटात हल्ली मराठी कलाकार बरेच दिसतात...-
वास्तविक वर्मा चित्रपटात कलाकारांना घेताना तो मराठी आहे, की पंजाबी, की साऊथ इंडियन असा विचार करत नाहीत. त्यांना फक्त चांगले काम हवे असते. म्हणूनच चांगली गुणवत्ता असणार्या कलाकारांच्या ते शोधात असतात. आणि त्याला आपल्या चित्रपटात ते पैलू पाडतात. त्यामुळे त्यांचे कोणतेही चित्रपट असो कलाकार चांगला अभिनय कताना दिसतात. आता आमच्या चित्रपटात दाक्षिणात्य कलावंत हिरो आहे. त्यामुळे केवळ मराठीच असं नव्हे तर गुणवत्ता म्हणून ते कलाकारांकडे बघतात. बॉलीवूडमध्ये मराठी कलाकारांना काम करताना वेगळं काय वाटतं? -
मला वाटतं भाषेचा फरक सोडला तर सगळीकडे सारखंच असतं. कॅमेर्याची भाषा तर सगळीकडे सारखीच असते. अभिनय केवळ भाषेतूनच येतो असं नाही तर तो सगळ्या देहबोलीतून बोलला पाहिजे. त्यामुळे तीही भाषा सगळीकडे सारखीच असते. माझ्या बाबतीत तर माझी सुरवात हिंदीतूनच झालीय. 'झी'च्या टॅलेंट हंटमधून मी पुढे आले. नंतर हिंदी सिरीयलही केल्या. मग मराठी चित्रपट केले. आता हिंदीही करतेय. त्यामुळे हे वातावरण मला नवं नाही. चित्रपट पहाताना कोणत्या गोष्टीला महत्त्व देते. -
दिग्दर्शकाला. कारण तोच चित्रपटाला पुढे ओळख देणार असतो. त्यामुळे चित्रपट निवडण्याच्या बाबतीत मी खूप 'चुझी' आहे. मराठी चित्रपट स्वीकारण्याच्या बाबतीतही तेच आहे. मी 'गोलमाल' आणि 'साडेमाडेतीन' हे दोन बडे चित्रपट केले. पण तसेच निर्माते, दिग्दर्शक असले तर मी मराठी चित्रपटही करेन. पण मराठीत बजेटच्या बाबतीत खूप तडजोड करतात नि चित्रपट त्या दर्जाचे तयार होत नाहीत. त्या तुलनेत हिंदीत पर्याय पुष्कळ असतात. आता थोडं 'एकापेक्षा एक विषयी'. या रियलिटी शोने तुला काय दिलं? -
मला महाराष्ट्रभर ओळख दिली. या निमित्ताने मी अगदी घराघरांत पोहोचले. अगदी आजी-आजोबांपासून मुलांपर्यंत माझे नाव पोहोचले. मी चांगली नृत्य करते हे त्यांना कळले. ही मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेत तुला उपविजेतेपद मिळाल्याबद्दल तुला धक्का बसला काय? -
धक्का असं नाही म्हणता येणार. पण थोडी नाराज मात्र झाले. वाईट वाटलं. अर्थात प्रेक्षकांच्या हातात हे सारं अवलंबून असल्याने त्याला इलाज नाही. पण या शोत भार्गवी चिरमुले विजेती ठरल्याचाही मला आनंद झाला. मी या स्पर्धेत सुरवातीपासूनच चांगला डान्स करत होती. लोकांना तो आवडतही होता. त्याचबरोबर माझ्या लोकप्रियतेला मर्यादाही आल्या. कारण मी मराठी सिरीयलही करत नव्हते. त्यामुळेच कदाचित लोकांची मते मिळविण्यात मला अपयश आलं असाव. अर्थात म्हणून मी उमेद हरले नाही. गुणवत्ता दाखविण्याची संधी जिथे मिळेल तिथे मी ती दाखवेनच.