सौरव नावाचे वादळ
|
आपली संपूर्ण कारकिर्द अनेक वाद-विवाद आणि चढ-उतारांचा सामना करण्यातच घालवाव्या लागलेल्या या खेळाडूने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली 'दादागिरी' तशीच शाबूत ठेवली. आणि आता निवृत्ती घेऊन हे वादळ शांत झाले आहे.
| |
संघातील युवा खेळाडूंना सतत पाठबळ देणे. त्यांच्यात धावांची आणि बळी घेण्याची भूक वाढविणे, आणि प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच शब्दात अगदी संत तुकारामांच्या 'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी' शैलीतून उत्तर देणा-या दादाला म्हणूनच तर 'दादा' म्हणतात. ऑस्ट्रेलियासारखा बलाढय देश असो किंवा पाकिस्तान सारखा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी सौरवच्या नेतृत्वाखाली संघाने या देशांना त्यांच्याच भूमीवर पाणी पाजण्याचा इतिहास घडविला आहे.
जितकी आग गांगुलीची बॅट धावा करून ओकत असे तितकीच गांगुलीच्या बॉडी लॅग्वेजमधूनही झळकायची. आणि म्हणूनच गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एकेकाळी जगातील बलाढ्य संघ समजला जात असे. विश्व चषकात अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याची कामगिरीही त्याच्याच काळातली. आज भारतीय संघात तरुण खेळाडूंमध्ये जिंकण्याचा जो स्पिरिट दिसतो हे दादाच्या मेहनतीचेच फळ म्हणावे लागेल. दादाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली ती देखिल या लढाऊ वृत्तीमुळेच.
क्रिकेटमध्ये प्रत्येक यशस्वी खेळाडूला विशेषणे दिली जात असतात. तद्वतच सौरवलाही 'द रॉयल बेंगॉल टायगर' म्हणून संबोधले जाते. मात्र हा वाघ केवळ कागदी नव्हता तर त्याची डरकाळी प्रतिस्पर्ध्यांना गर्भगळीत करणारी होती. हे त्याने अनेकदा सिध्द करून दाखविले आहे.
|
| |
मॅच फिक्सिंगच्या कीडीने ग्रासलेल्या भारतीय संघाला तारण्यासाठी 2000 मध्ये संघाची जबाबदारी सौरवकडे सोपविण्यात आली. सौरवने या दिव्यातून संघाला नुसते सावरलेच नाही. तर केवळ घरच्या मैदानावर जिंकण्याची क्षमता असलेल्या भारतीय संघाला विदेशी भूमीवरचा विजय काय असतो याची चवही चाखायला दिली.
आपल्या संघ सहका-यांवर पूर्ण विश्वास टाकणा-या आणि त्यांच्या मैदानावरील बॉडी लॅग्वेजमध्ये प्रचंड बदल घडवून आणणा-या दादाने कर्णधारपदाच्या काळात अनेक नव्या चेह-यांना संधी दिली. लॉर्ड्सच्या मैदानावर ब्रिटीशांना त्याच्याच भूमीवर पराभूत केल्यानंतर टी-शर्ट काढून ज्या पध्दतीने सौरवने उत्तर दिले होते ते कधीही विसरण्यासारखे नाही.
सौरवचे फटके आणि मैदानावरची फलंदाजीच त्याच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरेच काही सांगून जायची विशेषतः षटकार ठोकण्याची त्याची ती खास 'स्टाईल'. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या लॉर्डसच्या मैदानावर शतक ठोकण्याची इच्छा प्रत्येक फलंदाजाच्या मनात असते. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिनलाही या मैदानावर शतक ठोकता आलेले नाही. त्या मैदानावर एकाच मालिकेत दोन शतके ठोकण्याचा भीमपराक्रम दादाने करून दाखविला आहे.
| |
नंतरच्या काळात संघाच्या कामात सुधारणा होत गेली. गांगुलीची वैयक्तीक कामगिरी मात्र ढासळत गेली. भारतीय संघातील 'फॅब्युलिअस फोर' पैकी एक म्हणून ओळखल्या जाणा-या खेळाडूच्या बॅटीतून धावांचा रतिब कमी झाला. सातत्याने अपयशाने त्याचा सामना केला. संघाच्या व्यवस्थापनातही मोठे बदल झाले. नवख्या खेळाडूंना अधिक संधी दिल्या जाऊ लागल्या आणि नंतर गांगुली एकाकी पडला. अशा परिस्थितीतूनही त्याने स्वतःला सावरत जेव्हा-जेव्हा संधी मिळाली आपला नैसर्गिक खेळ करून क्रिकेटची सेवा केली आहे. आज निवृत्तीच्या टप्प्यात आल्यानंतरही गांगुलीने आपल्यात आणखी किती क्षमता आहे, हे सिध्द करून दाखविले आहे.
सचिन तेंडुलकर नावाच्या क्रिकेटच्या एका वादळासोबत आयुष्यातील अनेक सामने गाजविलेल्या या खेळाडूच्या निवृत्तीने सचिन खूपच दुःखी झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावर जरी दादा आता यापुढे दिसणार नसला तरीही वेगवेगळ्या सामाजिक कामांतून तो सतत आपल्या चाहत्यांना दिसणार आहे. म्हणूनच दादाच्या चांगल्या आणि वाईट प्रत्येक प्रसंगांमध्ये त्याला पूर्णपणे पाठिंबा देणा-या त्याच्या राज्याच्या विकासासाठी तो आता कार्य करणार आहे.
आयुष्यभर क्रिकेटमध्ये व्यस्त राहिलेल्या सौरवच्या निवृत्तीनंतर त्याच्या कुटुंबीयांना आनंद होत असला तरीही क्रिकेटवर सच्चे प्रेम करणा-या प्रत्येकाला सौरवची निवृत्ती चटका लावून जाणारी आहे.
