अलोन : चित्रपट परीक्षण
बॉलिवूडमध्ये हॉरर सिनेमांची फार क्रेझ दिसून येत नाही कारण असे सिनेमे हिट ठरलेले फार कमी वेळा पाहायला मिळालंय. हा सिनेमा म्हणजे 2007 साली आलेल्या अलोन या सिनेमाचा रिमेक आहे. हाच सिनेमा रोमान्स आणि हॉररसहीत पुन्हा प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आलाय. अलोन सिनेमात बिपाशा दोन जुळ्या बहिणींच भूमिकेत दिसते. संजना आणि अंजना.. दोघीही लहानपणापासूनच एकमेकींना जोडलेल्या आहेत. लहानपणापासून कबीर संजनावर खूप प्रेम करतोय.. आणि अंजना कबीरवर.. कबीर-संजनाची प्रेमकहाणी फुलताना पाहून अंजनाचा जळफळाट होतो.. तिला कबीर हवा असतो.. त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असते. या सोबतच सिनेमाचं कथानक पुढे सरकतं आणि भूत-आत्माचा खेळ सुरू होतो. पण, मग संजनाचा आत्मा अंजनाचा सूड घेते? हे तर सिनेमा पाहूनच तुम्हाला कळेल. सिनेमाचं कथानक चांगलं आहे.. पुढे काय होणार? यात सिनेमाच्या शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राखण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. बिपाशानं आपला अभिनयही उत्तम पद्धतीनं सादर केलाय. संजना आणि अंजना या दोन्हीही भूमिका तिनं उत्तम पद्धतीनं रंगवल्यात.
टीव्ही कलाकार करन सिंग ग्रोवरनंही उत्तम अभिनय सादर केलाय. करनचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. अलोनचं संगीतही चांगलं झालंय. गाण्यांचं चित्रीकरण उत्तम पद्धतीनं सादर करण्यात आलंय. कतरा-कतरा गाण्याचा यासाठी विशेष उल्लेख करावा लागेल.. या गाण्याचे लोकेशन्स उत्तम आहेत. बिपाशाचा सिनेमा असल्यानं प्रेक्षकांना सुंदर आणि हॉट सिक्वेन्स पाहायची संधी मिळते. हा हॉरर सिनेमा प्रेक्षक एकदा नक्कीच पाहू शकतील.. सोबत कॉमेडीचाही तडका आहेच.
