1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
  6. दिल बोले हडिप्पा- रंजक भेळ

Dil Bole Hadippa Movie Review | दिल बोले हडिप्पा- रंजक भेळ

शाहिद कपूर
बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपड़ा
दिग्दर्शक : अनुराग सिंह
गीतकार : जयदीप साहनी
संगीत : प्रीतम चक्रवर्ती, जूलिय
कलाकार : शाहिद कपूर, राणी मुखर्जी, शेर्लिन चोप्रा, पूनम ढिल्लो, अनुपम खेर, राखी सावंत, व्रजेश हीरज
रेटिंग : 2.5/5

दिल बोले हडिप्पा हा यशराज फिल्म्सचा नवा चित्रपट म्हणजे याच बॅनरच्या आधीच्या चित्रपटांची भेळ आहे. भारत-पाकिस्तान फंडा (वीर झारा), क्रीडा (चक दे इंडिया), नौटंकी ( आजा नच ले) आणि वेषांतर (रब ने बना दी जोडी) या सगळ्याचे मिश्रण म्हणजे दिल बोले हडिप्पा. त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांत रूपेरी पडद्यावरून गायब झालेल्या आणि अपयश मागे लागलेल्या राणी मुखर्जीचे दणक्यात झालेले पुनरागमन. हा चित्रपट खूप ग्रेट वगैरे नाही आणि यशराजच्याच आधीच्या चित्रपटांचीही सर त्याला नाही. पण तो बर्‍यापैकी रंजन करतो. शाहिद कपूर नायक असला तरी चित्रपट राणीचा म्हणजे नायिकेचा आहे आणि तो त्याच नजरेतून पाहिल्यास मनोरंजन छान होईल हे नक्की.

शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाची कथा घडते ती पंजाबमधल्या एका गावात. हे गाव वाघा सीमेवर वसले आहे. इथे अनुपम खेरचा एक क्रिकेटचा संघ आहे. दरवर्षी गावात 'अमन कप' ही स्पर्धा होते. त्यात पाकिस्तानातूनही संघ येत असतो. त्या संघाकडून अनुपमचा संघ दरवर्षी मार खात असतो. सततच्या अपयशाने अनुपम वैतागले आहेत आणि यावर्षी ते संघाची धुरा मुलगा रोहनकडे (शाहिद कपूर) देतात. हा रोहन इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत असतो. त्याला नाईलाजाने संघाच्या कर्णधारपदाची आणि प्रशिक्षकपदाची सुत्रे स्वीकारावी लागतात. मग कथेत वीरा कौर (राणी मुखर्जी) हिचा प्रवेश होतो. हिला क्रिकेट फार आवडतं. आणि अमन कपमध्ये शाहिदच्या संघात खेळण्याची तिची इच्छा आहे. पण मुलगी असल्याने खेळता येणार नसल्याने ती चक्क मुलगा बनते आणि या संघात खेळते.

IFM
IFM
या पटकथेत भरपूर चुका, त्रुटी असल्या तरी पडद्यावर ती बरी साकारली आहे. मुख्य म्हणजे राणीने स्वतःच्या अभिनयावर हा चित्रपट तोलून धरला आहे. शाहिद कपूर ठीक. कथेला शेर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्या भूमिकांची फोडणी देण्यात आली आहे. ती तितकी जमलेली नाही. दिग्दर्शक अनुराग सिंहची कामगिरी बरी आहे, एवढंच म्हणावं लागेल. संगीत साधारण आहे.

दिल बोले हडिप्पा वाईट नाही, पण उत्तमही म्हणता येणार नाही. त्यातल्या त्यात बर्‍यापैकी मनोरंजन करतो एवढंच.
About Writer
अभिनय कुलकर्णी