'फॅशन': पडद्यामागचे उजेडात
निर्माता : मधुर भांडारकर, देवेन खोटे, रॉनी स्क्रूवाला, जरीना मेहता दिग्दर्शक : मधुर भांडारकर संगीतकार : सलीम-सुलेमान कलाकार : प्रियंका चोप्रा, कंगना, मुग्धा गोडसे, अरबाज खान, समीर सोनी, अर्जन बाजवा, किट्टू गिडवानी, हर्ष छाया, राज बब्बर, किरण जुनेजा मधुर भांडारकर यांना `पोलखोल` करणारा दिग्दर्शक म्हटले जाते. कारण अंधारात लपलेल्या गोष्टींवर त्यांची जरा जास्तच नजर असते. लपलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकून त्यांना उजेडात आणण्याची कला मधुर भांडारकर यांना चांगली जमते. मधुर भांडारकर यांनी यावेळी 'फॅशन' क्षेत्र निवडले आहे. फॅशनच्या दुनियेतील झगमगाट, उघडे देह, सुंदर चेहरे, स्टायलिश ड्रेसेस व त्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन तसेच यापलीकडे जाऊन प्रत्येक मॉडेल्सचे जीवन व फॅशनच्या दुनियेमागे कोणते प्रकार सुरू असतात, हे जाणून घेण्यासाठी मधुर चक्क कॅमेरा घेऊन मॉडेल्सच्या ग्रीनरूमच शिरला आहे. चंडीगडमध्ये राहणाऱ्या मेघना माथुरची (प्रियंका चोप्रा) ही कथा आहे. तिच्या डोळ्यांमध्ये खूप स्वप्न आहेत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कुटुंबाच्या विरोधात जाऊन रुपेरी नगरी समजल्या जाणाऱ्या मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. स्वप्नाच्या भोवऱ्यात सापडलेली मेघना दिशा भरकटते. त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावर होतो. मेघनाच्या चूक लक्षात येते तेव्हा मात्र खूप वेळ झालेली असते. महत्त्वाकांक्षी मेघना तिचे स्वप्न पूर्ण करून घेते पण एवढ्या शिखरावर जाऊन तिला एकटेपणा जाणवतो. कुटुंबाला गमावून बसलेल्या मेघनाला वाटते की, मिळालेल्या यशाच्या बदल्यात आपण फार मोठी किंमत चुकवली आहे.
चित्रपटात जेनेट (मुग्धा गोडसे) व सोनाली गुजराल (कंगना) ही देखील दिशाहीन झालेली मुख्य पात्रे आहेत. जेनेट खूप संघर्ष करूनही ती 'सुपरमॉडेल' होऊ शकलेली नाही. फॅशनच्या दुनियेच्या 'टच'मध्ये राहण्यासाठी ती राहुल (समीर सोनी) नामक तरुणाशी लग्न करते. सोनालीच्या रूपात मॉडेल्सची मानसिक स्थिती दाखविण्यात आली आहे. ती एक सुपरमॉडेल आहे. मात्र कामाच्या व्यापात ती ड्रग्सच्या आहारी जाऊन स्वत:ला हरवून बसते. मधुरने फॅशनच्या दुनियेला सर्व बाजूंनी पडताळून पाहिले आहे. 'फॅशनच्या दुनियेत असलेले ग्लॅमर, चेहऱ्यामागे असलेली अश्लीलता, राजकारण, इर्षा, रस्सीखेचपणा व शोषणाला त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रस्तुत केले आहे. मॉडल्सजवळ प्रसिद्धी तसेच पैसा असतो मात्र ते कंपन्यांचे गुलाम बनून राहतात. कांट्रॅक्टच्या जाळ्यात ते अशा पद्धतीने अडकतात की, त्यांना त्यातून बाहेर पडणे जवळजवळ अशक्यच असते. कंपन्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत असतात. फॅशनच्या दुनियेत महिला मॉडेल्सवर खूप रुपये खर्च केले जात असल्याने ना त्या लग्न करू शकतात ना गर्भवती होऊन आई होऊ शकतात.
मधुर यांनी चित्रपट छान केला आहे. त्यांच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. त्या काही प्रमाणात पूर्ण करण्यात मधुर यांना यश मिळाले आहे. मात्र 'फॅशन'च्या जगापेक्षा मेघना माथुरच्या संघर्षमय प्रवासावरच अधिक काळ कॅमेरा ठेवला आहे. 'फॅशन' पाहिल्यानंतर प्रेक्षकाच्या मनात फॅशन दुनियेविषयी घृणा निर्माण होते. असे वाटते की, मॉडेल होण्यासाठी नैतिक मूल्ये देखील धाब्यावर ठेवतात. 'फॅशन' मधून मॉडेलिंगच्या नकारात्मक बाजूवरच कॅमेरा फिरवण्यात आला आहे. सकारात्मक बाजू फारशा दिसत नाही. मेघनाला या ग्लॅमरच्या दुनियेतून परत घराची वाट दाखविण्यात मधुर यांनी चित्रपट विनाकारण लांबविला आहे. '
फॅशन'ची कथा मध्यांतराच्या आधी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करते. नंतर मात्र, प्रेक्षकांची नजर चित्रपटगृहातून बाहेर पडणारा दरवाजा शोधू लागते. निरंजन आयंगर लिखित संवाद छोटे व मर्मभेदी आहेत. गीत-संगीत वाखणण्याजोगे आहे. 'मर जावा' व 'जलवा' हे चित्रपटात अंतरा अंतराने वाजणारे पार्श्वसंगीत लाजवाब आहे.प्रियंका चोप्राचा अभिनय छान आहे. इतर नायिकाच्या तुलनेत तिलाच पडद्यावर जास्त वेळ राहण्याची संधी मिळाली आहे. कंगनाचा अभिनय प्रशंसनीय आहे. रोल छोटा आहे परंतु प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घर करणारा आहे. मुग्धा गोडसेला 'फॅशन'मध्ये पहिल्यानंतर वाटत नाही की, तिचा हा पहिला चित्रपट आहे. पूर्ण आत्मविश्वासाने तिने जेनेट साकारली आहे. अरबाज खान, अर्जन बाजवा, हर्ष छाया व समीर सोनी आदी कलाकारांनी देखील अभिनय करताना कुठलीच कसर सोडलेली दिसत नाही. एकुणात पाहिले तर 'फॅशन'ची कथा, उत्कृष्ट प्रस्तुतीकरण व सशक्त अभिनयाच्या जोरावर एकदा पाहण्यास काही हरकत नाही.