Last Modified: न्यू यॉर्क , शनिवार, 12 एप्रिल 2008 (17:08 IST)
ऑलिंपिक सुखरूप पार पडो- दलाई लामा
चीनमध्ये होणार्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकावा या मताचे आपण नाही, असे तिबेटी धार्मिक नेते दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हा निर्णय व्यक्तिगत असून या स्पर्धेला उपस्थित रहायचे की नाही, हे जागतिक नेत्यांनी स्वतः ठरवायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
चीनने तिबेटमध्ये चालवलेल्या दडपशाहीविरोधात तेथे होणार्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दलाई लामांनी त्यांची भूमिका मांडली. ऑलिंपिक खेळांना उपस्थित न रहाण्याचा सल्ला इतर देशांना द्याल का असे विचारले असता, त्यांनी त्यास नकारात्मक उत्तर दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यासह जगातील इतर देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार घालावा काय असे विचारले असता, चीनमध्ये होणारी ही जागतिक स्पर्धा सुखरूप पार पडावी अशीच आपली सदिच्छा आहे. मात्र या खेळांना उपस्थित रहायचे की नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, असे त्यांनी एनबीसी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.