शोएब मधुमेहाचा रोगी!
पीसीबीचा सिरींजबद्दल नकार
मागील महिन्यात आयपीएलचे सामने खेळण्यासाठी येत असताना कराची विमानतळावर शोएब अख्तरच्या बॅगमध्ये सिरींज सापडल्याप्रकरणी अख्तरची चौकशी करण्यात आल्याच्या वृत्ताला पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) नकार दिला आहे. कोलकात्याला जाण्यासाठी मुंबईच्या विमानात बसताना कस्टम अधिकार्यांनी त्याने बॅगेत ठेवलेल्या सिरींजविषयी चौकशी केली असल्याचे वृत्त 'द नेशन' या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते.शोएबच्या बॅगेत जवळ जवळ तीन डझन सिरींज होत्या. तो आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्स संघात खेळत आहे. चौकशी दरम्यान शोएबने अधिकार्यांना सांगितले की, मला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे सिरींजची आवश्यकता पडत असल्याचे सांगितले होते. याघटनेबाबत मंडळाच्या एका वरीष्ठ अधिकार्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, या घटनेला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. कारण, सिरींज मोकळ्या होत्या आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मादक पदार्थ भरलेला नव्हता.