1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

राज ठाकरे सरकारवर कडाडले

राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्य सरकारवर कडाडले आहेत. राज्यात निवडणूक आचारसंहिता लोकशाही पद्धतीने लागू केलेली नाही, असे सांगून सरकार गरज नसलेल्या कामावर लक्ष देत आहे आणि गरजेच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, की सरकार जिल्हाधिकारी, पोलिस व अन्य सरकारी अधिकार्‍यांच्या माध्यमातून आचारसंहितेचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जात आहे. पक्षाचे लोक राज्याच्या विविध भागात प्रचारासाठी जातात, त्यावेळी त्यांना सरकारी विक्षामगृहात थांबण्यास मनाई केली जात आहे.

शाळेच्या आवारात सभा न घेण्यासंदर्भात ते म्हणाले, आता शाळांना सुट्या लागल्या आहेत. तरीही तिथे सभा घेतल्या जाऊ दिल्या जात नाहीत. अशा प्रकारे अडवणूक केली जात असेल तर प्रचार कसा करणार असा सवालही त्यांनी केला.

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारला असता, आपण आपल्या पक्षाच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहोत. कुणाच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नाबाबत आपल्याला काहीही देणेघेणे नाही, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणण्यासंदर्भात केलेल्या विधानांकडे लक्ष वेधले असता, आधी राज्यातल्या सहकारी बॅंकांमध्ये घोटाळे झाल्याने अनेकांचा पैसा बुडाला आहे. आधी तो पैसा परत मिळवून दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
About Writer
वार्ता