save water, Maharashtra, Drought, Water, Relief Package | पाणी वाचवाल तर वाचाल...!
संपूर्ण महाराष्ट्र कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाईने होरपळत आहे. एकेकाळी बारामाही पाण्याची सुबत्ता असणार्या ठिकाणीही आज पाणीटंचाई जाणवत आहे. म्हणूनच शहरासह ग्रामीण भागात राहणार्या सर्वांनीच 'जलसाक्षर' होण्याची गरज आहे. आज घरबसल्या नळाला सहजपणे पाणी उपलब्ध होत असले तरीही पाणी हे बाजारात तयार करता येत नाही, हे विसरून चालणार नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहेत. त्याचा अपव्यय होणार नाही याची आवर्जून काळजी घेतली तरी पाणीटंचाईची दाहकता कमी करता येईल. म्हणूनच घर, शाळा, कार्यालय, रुग्णालय, हॉटेल, खासगी व सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. यासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाने अंमलात आणण्याची 'जलसंहिता' पुढीलप्रमाणे-
पाण्यासाठी वापरत असलेल्या नळातून अथवा कपडे धुण्याच्या यंत्रातून एक-एक थेंब पाणी ठिबकत असेल तर ते तत्काळ थांबवा. नळातून प्रत्येक सेकंदाला जर एक थेंब पाणी ठिबकले तर एक वर्षात 12 हजार 500 लिटर पाणी वाया जाते. अर्थात हे पाणी वाचवले तर 4 माणसांच्या कुटुंबाला वर्षभराचे पिण्याचे पाणी मिळू शकते.
शहरातील अपार्टमेंट: उच्चभ्रू वस्तीत शॉवरने आंघोळ करुन 10 मिनिटात 135 लि. पाणी वापरले जाते. त्याऐवजी बादलीने आंघोळ केल्यास 40150 लि. पाणी वाचेल. हे वाचलेले पाणी वर्षभर 4 जनावरांना पुरेल.
गरज नसताना वारंवार शौचालयामध्ये फ्लशिंग करू नये, एकदा फ्लशिंग केले की एकावेळी किमान 8 लिटर पाणी वाया जाते. दिवसामध्ये जितक्यावेळा फ्लशिंग केले जाईल तितक्यावेळा पाणी वाया जाईल.